बेकायदेशीर मासेमारांनी आमची व्याख्या ठरवू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:19+5:302021-04-01T04:32:19+5:30
दापोली : बेकायदेशीर पर्ससीन नेटधारकांनी पारंपरिक मच्छीमारांची व्याख्या ठरवू नये. स्वत: बेकायदेशीर मासेमारी करताना पारंपरिक मच्छीमारांची व्याख्या ठरवणारे तुम्ही ...
दापोली
: बेकायदेशीर पर्ससीन नेटधारकांनी पारंपरिक मच्छीमारांची व्याख्या ठरवू नये. स्वत: बेकायदेशीर मासेमारी करताना पारंपरिक मच्छीमारांची व्याख्या ठरवणारे तुम्ही कोण, असा संतप्त प्रश्न हर्णै बंदर कमिटीचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावसे यांनी केला केला आहे. पर्ससीन नेटधारकांची बाजू मांडणाऱ्या नासिर वाघू यांनी दिशाभूल करणे बंद करावे. आम्ही आमच्या हक्कासाठी उपोषणाला बसलो आहोत, असेही त्यांनी ठणकावले आहे.
दापोली, मंडणगड, गुहागर संघर्ष समितीचे एलईडी मासेमारीविरोधात साखळी उपोषण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पर्ससीन नेटधारकांनी पारंपरिक मच्छीमारांची व्याख्या काय, असा प्रश्न केल्याने पारंपरिक मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली आहे. या टीकेला बाळकृष्ण पावसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पारंपरिक विरुद्ध पर्ससीन असा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पारंपरिक मच्छीमार नियमात मासेमारी करत नसल्याचे वक्तव्य वाघू यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका पावसे यांनी केली. पारंपरिक मच्छिमारांची व्याख्या ठरवणारे पर्ससीन नेटधारक किती कायद्यात मासेमारी करतात ते आधी त्यांनी सांगावे. आपण जर कायद्यात मासेमारी करत नसू तर दुसऱ्याच्या घरावर उगाच दगड मारण्याची भाषा कोणी करू नये, असा इशारा त्यांनी दिला.
पर्ससीनधारक किती नियमित मासेमारी करतात, याची कुंडली आपल्याकडे आहे. शासनाने पाचशे मीटरच्या आत मासेमारी करण्याला परवानगी दिली आहे. मात्र पर्ससीनधारक पंधराशे ते दोन हजारपर्यंत जाऊन मासेमारी करतात. खोली ४० मीटर ठरवून देण्यात आली आहे. परंतु ५० ते ७० मीटरपर्यंत जातात. त्यांना जाळीचा आस २५ एमएम ठरवून देण्यात आला आहे. परंतु पर्ससीनधारक दहा ते पंधरा एमएमपर्यंतचे जाळे वापरतात. किती मीटर लांब जाळ्याची परवानगी आहे आणि किती मीटरचे जाळे वापरले जात, हेही वाघू यांनी जाहीर करावे, असे आव्हानच पावसे यांनी दिले आहे.
सोमवंशी अहवालानुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत परवानाधारक पर्ससीन नेटधारकांना मासेमारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु तुम्ही कधीपर्यंत मासेमारी करता, असा प्रश्नही त्यांनी केला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १८२ पर्ससीन बोटींकडे परवाना आहे. मात्र प्रत्यक्षात सुमारे दोन हजार बोटी मासेमारी करीत आहेत. एक हजार मिनी पर्सनेट बोटी मासेमारी करीत आहेत. त्यामुळेच समुद्राचा सत्यानाश झाला आहे. असे असतानाही पारंपरिक मच्छिमारांना धमकी देणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणावे लागेल, असा आरोपही त्यांनी केला.
.....................
फोटो आहे.