मिरवणे, कोळकेवाडी येथे बेकायदा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:32 AM2021-03-31T04:32:15+5:302021-03-31T04:32:15+5:30
चिपळूण : तालुक्यातील मिरवणे, कोळकेवाडी येथे बेकायदा देशी-विदेशी दारूसाठ्यावर पोलिसांनी धाड टाकल्याची तसेच येगाव येथे गावठी दारू बाळगणाऱ्यावर कारवाई ...
चिपळूण : तालुक्यातील मिरवणे, कोळकेवाडी येथे बेकायदा देशी-विदेशी दारूसाठ्यावर पोलिसांनी धाड टाकल्याची तसेच येगाव येथे गावठी दारू बाळगणाऱ्यावर कारवाई केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दिलीप बाबाजी गुढेकर (मिरवणे-कुंभारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून याबाबतची फिर्याद दिलीप जानकर (चिपळूण पोलीस स्थानक) यांनी दिली आहे. गुढेकर याने मिरवणे-कुंभारवाडी येथे बेकायदा गावठी हातभट्टीची दारू तसेच देशी-विदेशी दारू विकी करण्यासाठी साठा करुन ठेवला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी गुढेकर याच्यावर धाड टाकून ७ हजार ३६ रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.
कोळकेवाडी ग्रामपंचायत परिसरात लाकडे ठेवण्यासाठी असलेल्या झोपडीत अश्विनी एकनाथ साळवी (४७, कोळकेवाडी-कुंभारवाडी) हिने बेकायदा विदेशी दारूसाठा विक्रीसाठी ठेवला असल्याने तिच्यावर अलोरे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साळवी हिच्याकडून ६ हजार ६०० रुपयांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद चंद्रकांत आनंद नाईक (अलोरे पोलीस स्थानक) यांनी दिली आहे.
येगाव-कुरपणवाडी येथे बेकायदा गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या काशिनाथ रघुनाथ चव्हाण (५५, येगाव-कुरपणवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण याच्याकडून ९६० रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद सचिन चव्हाण (सावर्डे पोलीस स्थानक) यांनी दिली आहे.