अवैध दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:11+5:302021-05-08T04:33:11+5:30
खेड : सध्या जिल्हा प्रशासनाने कडकडीत लॉकडाऊन जाहीर केले आहे. सर्व व्यवसाय बंद असताना मात्र तालुक्यातील संगलट येथे गावठी ...
खेड : सध्या जिल्हा प्रशासनाने कडकडीत लॉकडाऊन जाहीर केले आहे. सर्व व्यवसाय बंद असताना मात्र तालुक्यातील संगलट येथे गावठी हातभट्टीच्या दारूची अवैधरित्या विक्री होत आहे. त्यामुळे इतर गोष्टींची नागरिकांना वानवा जाणवत असली तरीही तळीरामांची मात्र चांगलीच सोय झाली आहे.
नुकसानभरपाईची प्रतीक्षा
रत्नागिरी : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ६४ हजार शेतकऱ्यांची अतोनात नुकसान केले होते. यापैकी ७२ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. केवळ छायाचित्र पंचनाम्यासाठी ग्राह्य धरला जाईल या निकषाने जिल्ह्यातील पंचनामे वेगाने करण्यात आले होते. मात्र अजूनही या शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा करावी लागत आहे.
विक्रीवर परिणाम
चिपळूण : जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला व्यवसायाला सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र भाजी विक्रीला जास्त प्रमाणात मागणी असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट सध्या बंद असून घरपोच सेवेला तितकासा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे भाजी व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
बालसंस्कार शिबिर
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा, खेर्डी, चिंचघरी (सती) येथे ११ दिवसांचे ऑनलाइन बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. यात दररोज परिपाठ, संस्कार कथा, पसायदान, श्लोक तसेच अन्य नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले होते.
अधिकाऱ्यांना इशारा
रत्नागिरी : कोरोनासहीत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन स्थितीत अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी प्रशासनाचा मोबाइलद्वारे सतत संपर्क रहाणे गरजेचे आहे. त्यामुळे या कालावधीत मोबाइल बंद आढळल्यास अथवा संपर्क न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सक्त आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत.
विजेचा लपंडाव
देवरुख : शहर आणि परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कांजीवरा परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. वीज वारंवार जाणे, कमी दाबाने पुरवठा आदी समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
मदत केंद्र सुरू
रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती दक्षिण रत्नागिरी यांच्यावतीने जिल्हा शासकीय रुग्णालय येथे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीसाठी जनकल्याण समिती पुढे आली आहे. समितीतर्फे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. यात समितीचे २० स्वयंसेवक काम करीत आहेत.