संचारबंदीतही वाळू उपसा - चिपळुणातील गोवळकोट परिसरात बेकायदा वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 04:05 PM2020-04-17T16:05:04+5:302020-04-17T16:07:01+5:30
या बोटींची पाहणी केली असता त्यामध्ये वाळूचा साठा दिसून आला. मात्र, या बोटीही बेवारस असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पथकाने या सर्व बोटी पाण्यात बुडविल्या. गोवळकोट भागात महसूल विभागाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
चिपळूण : कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही चिपळूण तालुक्यातील गोवळकोट खाडीत बेकायदा वाळू उपशाचे काम करण्यात येत असल्याचा प्रकार गुरूवारी रात्री उघडकीस आला. प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी केलेल्या धडक कारवाईत सुमारे दोन - दोन ब्रास असलेल्या बेवारस ९ बोटींना जलसमाधी देण्यात आली. ही कारवाई गुरूवारी रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्याने करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला व विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अन्य वाहतूक व बेकायदा व्यवसायांवर प्रशासनाची नजर आहे. गोवळकोट खाडी भागात संचारबंदी काळातही राजरोस वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी आणि नायब तहसीलदार शेजाळ यांनी तत्काळ गोवळकोट येथील नदीपात्रात ही कारवाई केली.
गोवळकोट खाडीत अधिकाऱ्यांचे पथक येत असल्याची माहिती मिळताच बोटीवरील लोकांनी बोटी किनाऱ्यावर ठेवून पलायन केले. त्यामुळे या कारवाईत कोणीही हाती लागले नाही. या बोटींची पाहणी केली असता त्यामध्ये वाळूचा साठा दिसून आला. मात्र, या बोटीही बेवारस असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पथकाने या सर्व बोटी पाण्यात बुडविल्या. गोवळकोट भागात महसूल विभागाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.