प्रतिमा पूजनाने उत्तरकार्य; जोशींचे समाज प्रबोधनासाठी प्रयत्न सुरू
By admin | Published: December 30, 2014 09:36 PM2014-12-30T21:36:35+5:302014-12-30T23:32:43+5:30
ढवळ यांच्या कार्याला त्यांनी उजाळा देत त्यांच्या स्मृती जागविल्या
रत्नागिरी : व्यक्तीच्या निधनानंतर पिंडदानासारखे कुठलेही कार्य न करता केवळ त्याच्या प्रतिमा पूजनाने उत्तरकार्य करून समाजात खऱ्या अर्थाने समाजप्रबोधनाचा प्रयत्न प्रबोधनकार मारूतीकाका जोशी करीत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील बहुजन विकास आघाडीचे सल्लागार सदस्य तुकाराम ढवळ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे उत्तरकार्य मारूतीकाका जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. जोशी यांनी कुटुंबियांना त्यांच्या प्रतिमेचे पूजन करायला लावले. यानंतर त्यांनी उपस्थितांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले. ढवळ यांच्या कार्याला त्यांनी उजाळा देत त्यांच्या स्मृती जागविल्या. यावेळी उपस्थित जयराम रामाणे, नारायण भुरवणे, मधुकर बार्इंग, अमोल लाड, रावसाहेब शिवगण, अजय रामाणे, बविआचे सुरेश भायजे, शंकर लाड, डी. के. मांडवकर, दत्तराम जोयशी आदी मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून जोशीकाकांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी तुकाराम ढवळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जोशी यांनी आतापर्यंत चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यांमध्ये प्रतिमापूजनाने उत्तरकार्य करण्यासाठी प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. हा त्यांचा ६०वा कार्यक्रम होता. या वयातही जिल्हाभर त्यांचे प्रबोधन सुरू आहे. विशेष म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते, डिंगणी, कासारकोळवण, चोरवणे, रत्नागिरी तालुक्यातील खानू मठ, कशेळीकोंड, गावडेआंबेरे तसेच चिपळूण तालुक्यातील पिंपरी या गावांनी हा उपक्रम आपल्या गावात सुरू केला आहे.
केवळ प्रतिमेचे पूजन करून उत्तरकार्य करून मारूतीकाका जोशी यांनी आपली परंपरा सुरू ठेवली आहे. समाजप्रबोधनासाठी हा पायंडा त्यांनी गेले काही वर्षे सुरू ठेवल्याबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. (प्रतिनिधी)