ऑफलाईन लसीकरणाच्या मंडणगड पॅटर्नचे जिल्ह्यात अनुकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:43+5:302021-05-30T04:25:43+5:30
मंडणगड : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सुरू असलेल्या लसीकरणातील गाेंधळ टाळण्यासाठी मंडणगड तालुक्याने ऑफलाईन लसीकरणाचा पॅटर्न अवलंबला ...
मंडणगड : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सुरू असलेल्या लसीकरणातील गाेंधळ टाळण्यासाठी मंडणगड तालुक्याने ऑफलाईन लसीकरणाचा पॅटर्न अवलंबला हाेता़ हा पॅटर्न यशस्वी झाला असून, लसीकरणातील गाेंधळही थांबला असून, मंडणगडच्या या पॅटर्नचे अनुकरण जिल्ह्यात करण्यात येत आहे़
लसीकरण अभियानात स्थानकांचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. लसीकरण अभियानाची मे महिन्याची सुरुवात १८ पासून पुढे वय असलेल्या सर्व वयोगटांतील व्यक्तीसाठी खुली झाली़ त्यात वेळोवेळी बदल झाले व दुसऱ्या आठवड्यात १८ ते ४४ पर्यंतच्या नागरिकांना पहिला डोस देण्याचे अभियान थांबविण्यात आले. सुरुवातीपासूनच केंद्रावरच नोंदणीचा पर्यायही बंद झाला़ त्यामुळे लसीकरण हवे असल्यास ऑनलाईन नोंदणी सक्तीची झाली. मंडणगड तालुक्याची परिस्थिती येथील ग्रामीण भागात माहिती व तंत्रज्ञानाच्या संसाधानाचा अभाव व स्मार्ट फोन्स असले तरी इंटरनेट अनुपस्थिती यामुळे कागदावर मंडणगड तालुक्यास डोस मिळत असले तरी त्याचा तालुकावासीयांना प्रत्यक्ष लाभ होत नव्हता. ऑनलाईन पद्धतीत तालुक्यास मिळणाऱ्या लसीचा स्थानिकांना केवळ दहा टक्केच लाभ मिळत होता़ नव्वद टक्के तालुक्याबाहेरील व्यक्ती या अभियानाचा मंडणगड तालुक्यातील विविध लसीकरण केेेंद्रांवर उपस्थित राहून लाभ घेत होते़ यामुळे एकीकडे तालुक्यात कोरोना प्रसाराचा धोका वाढलेला असतानाच स्थानिकांना लस मिळत नव्हती़ त्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष वाढत होता. त्यातूनच तालुक्यातील एका लसीकरण केंद्रांवर स्थानिक विरुद्ध बाहेरचे असा संघर्ष पाहायला मिळाला़ त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी ऑफलाईन लसीकरणाची मागणी उचलून धरली होती़
तालुक्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पितळे यांनी ही मागणी पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला. त्यानंतर मंडणगड तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने लसीकरणाची सोय उपलब्ध झाली़ त्यामुळे केंद्रावर उपस्थित असलेल्या पात्र व्यक्तींना लसीचा डोस उपलब्ध होत आहे़ अभियानास गती आली असून, पूर्वी असलेले दहा टक्के लाभाचे प्रमाण नव्वद टक्के इतके वाढले आहे़ लवकरच ते शंभर टक्क्यांपर्यंत जाण्याचे संकेत आहे. गेल्या आठ दिवसांत घडलेल्या विविध घडामोडीत मंडणगड तालुक्याने अंगीकारलेला व यशस्वी होत असलेला ऑफलाईन लसीकरणाचा पॅटर्न रस्तागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही अंगीकारला जात आहे़ तालुक्यातील गावामध्ये जाऊन लसीकरणाच्या सुरुवात झाली आहे़ शनिवारी कुंबळे, देव्हारे, पणदेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील म्हाप्रळ, वेस्ली, तुळशी या गावांमध्ये लसीकरण सुरू आहे़ त्यामुळे मंडणगडचा पॅटर्न लाभाचा ठरत आहे़