संपलेल्या लाकडाची लगेचच करुन घेतली उपलब्धता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:31 AM2021-04-27T04:31:58+5:302021-04-27T04:31:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दापोली : केवळ शहरच नाही तर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर दापोलीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. काहीवेळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दापोली : केवळ शहरच नाही तर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर दापोलीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. काहीवेळा आधीच्या चितेचे निखारे विझण्याआधीच नवे मृतदेह स्मशानभूमीत जाऊन पोहोचत आहेत. त्यामुळे नगर पंचायतीचे दहा सफाई कामगार आता हेलावून गेले आहेत. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ७५ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांच्या वाढत्या संख्येमुळे येथील लाकूड संपल्याचा प्रकार सहा दिवसांपूर्वी झाला होता. मात्र नगर पंचायतीने वन विभागाच्या सहकार्याने लाकूड उपलब्ध करून घेतले आहे.
दापोली शहरातील ही परिस्थिती अतिशय गंभीर असून, दिवसागणिक चार ते पाच लोकांचा मृत्यू होत असल्याने अंत्यसंस्कार करणाऱ्या नगर पंचायत कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत केवळ आणि केवळ अंत्यसंस्कार करणे ही एकच जबाबदारी दहा सफाई कामगारांवर येऊन ठेपली आहे.
एप्रिल महिन्यात मृत्यूने थैमान घातले असून, एक एप्रिलपासून आजर्पंत ७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी सुरक्षिततेची साधने वापरुन सर्व सोपस्कार करत आहेत.
दापोली स्मशानभूमीत विद्युतदाहिनी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना साध्या पद्धतीने सरण रचून अग्नी द्यावा लागत आहे. यासाठी लागणारा लाकूड साठा २० एप्रिलपर्यंतच पुरला. मात्र २० रोजी साठा संपल्यानंतर नगर पंचायतीने गांभीर्य ओळखून तत्काळ लाकूड उपलब्ध करून घेतले. नगर पंचायतीने वन विभागाशी संपर्क साधून लाकूड उपलब्ध करुन घेतले. अंत्यसंस्कार करण्यात कोणत्याही प्रकारची हेळसांड होऊ नये, याची संपूर्ण खबरदारी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, नगराध्यक्षा परवीन शेख, उप नगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर, नगर पंचायतीचे लेखापाल दीपक सावंत यांनी घेतली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लाकूड मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच त्यासाठी लागणारे पेट्रोल, अंत्यसंस्कार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना लागणारे ७ ते ८ पीपीई कीट दररोज उपलब्ध करून दिले जात आहेत. हा सगळा खर्च नगर पंचायत करत आहे.
दापोली तालुक्यातील व्यक्तीचा शहरातील कोणत्याही कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाल्यास मौजे दापोली या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. मृतदेहांची परवड होऊ नये, सर्व सोपस्कार योग्य पद्धतीने पार पाडले जावेत, यासाठी नगर पंचायत विशेष लक्ष देत आहे.
........................
दापोली तालुक्यातील सर्वच कोरोनाचे मृतदेह मौजे दापोली स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येत आहेत. या मृतदेहाची कोणत्याही प्रकारची हेळसांड होऊ नये, यासाठी नगर पंचायतीने दहा कर्मचाऱ्यांची टीम तयार केली आहे. या संकट काळात अनेक लोक अडचणीत असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे लक्षात आल्याने अंत्यसंस्कार विनामूल्य करण्याचा निर्णय दापोली नगर पंचायतीच्या सर्व नगरसेवकांनी घेतला आहे.
- महादेव रोडगे, मुख्याधिकारी, दापोली