शिवनदीतील गाळ तत्काळ उपसा : शाहनवाज शाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:30+5:302021-05-30T04:25:30+5:30
चिपळूण : येथील नगरपालिका प्रशासनाने विशेष सभेत शिवनदीचा गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. पावसाळा तोंडावर असतानाही अद्याप गाळ काढण्याचे ...
चिपळूण : येथील नगरपालिका प्रशासनाने विशेष सभेत शिवनदीचा गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. पावसाळा तोंडावर असतानाही अद्याप गाळ काढण्याचे काम सुरू झालेले नाही. पावसाळ्यापूर्वी ते काम मार्गी लागले नाही तर यावर्षीच्या अतिवृष्टीच्या काळातही शहराला पुराचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तत्काळ ते काम हाती घेऊन शिवनदीला गाळमुक्त करावे, अशी मागणी येथील शाहनवाज शाह यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शिवनदीतील गाळ न काढल्यामुळे त्याचा शहरातील जनजीवन, बाजारपेठ व पर्यावरणावर कोणता दुष्पपरिणाम होईल, शहरवासीयांना कोणत्या संकटाशी सामना करावा लागेल, याचा अभ्यास शाह यांनी केला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे ते शिवनदीतील गाळ उपशासंदर्भात आणि नदीचे पावित्र्य जपण्यासाठी पाठपुरावाही करत आहेत. याबाबत माहिती देताना शाह म्हणाले, मैला व सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. चिंचनाका पुलावर लोखंडी जाळी लावून फलक लावूनही काहीच फरक पडलेला नाही. आजही तेथे जाळीच्या वरून कचरा टाकला जात आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. दूषित सांडपाणी व गाळाने शिवनदी भरल्याने पाण्याचे योग्य विसर्जन होत नाही. त्यामुळे शहराला पुराचा धोका उद्भवतो. पावसाच्या तोंडावर लाखो रुपये खर्च करुन गाळ काढला जातो. मात्र, काढलेला गाळ काठावरच ठेवल्याने तो पुन्हा नदीत जातो. यामध्ये लाखो रूपये पाण्यात जातात. काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने शिवनदीतील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. जलसंपदा विभागाकडून गाळ काढून तो योग्य जागी साठा करून ठेवण्यास परवानगीसुध्दा मिळाली आहे. मात्र, तरीही त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.