महामार्गावरील बोअरवेल ब्लास्टिंग तत्काळ बंद करा, घरांना तडे गेलेल्यांना भरपाई द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 04:01 PM2023-04-08T16:01:07+5:302023-04-08T16:01:36+5:30

राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामातील दगड फोडण्यासाठी बोअरवेल ब्लास्टिंगचा वापर

Immediately stop borewell blasting on highways, compensate those whose houses are cracked; Orders of Collectors | महामार्गावरील बोअरवेल ब्लास्टिंग तत्काळ बंद करा, घरांना तडे गेलेल्यांना भरपाई द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

महामार्गावरील बोअरवेल ब्लास्टिंग तत्काळ बंद करा, घरांना तडे गेलेल्यांना भरपाई द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

googlenewsNext

रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामातील दगड फोडण्यासाठी बोअरवेल ब्लास्टिंगचा वापर केला जात आहे. त्यामुळे परिसरातील अनेक घरांना तडे गेल्याच्या तक्रारी संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा-मानसकोंड ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केल्या हाेत्या. याची नोंद घेऊन जिल्हाधिकारी यांनी ब्लास्टिंग तत्काळ बंद करा, असे आदेश दिले आहेत. तसेच ज्या घरांना तडे गेले आहेत, त्यांना भरपाई द्या, असेही सांगितले आहे.

कुरधुंडा (ता. संगमेश्वर) गावातील राष्ट्रीय महामार्गावरील बोअरवेल ब्लास्टिंगला ग्रामपंचायतीने विरोध करूनही ते बंद करण्यात आले नव्हते. एका वेळी २५ ते ३० पेक्षा जास्त होल अडीचशे फुटांपेक्षा खोल मारून त्या ठिकाणी बोअरवेल ब्लास्टिंग केले जात होते. याचा फटका ग्रामस्थांना बसला असून, गावातील अनेक घरांना तडेही गेले आहेत.

ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली हाेती. त्याची दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी या भागाची पाहणी केली. प्रत्यक्षात लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन त्यावर जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले हाेते.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कार्यालयात ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, कंपनीचे अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेऊन ब्लास्टिंग बंद करा, असे आदेश दिले. त्याचबराेबर ज्या घरांना तडे गेले आहेत, त्यांची नुकसान भरपाई द्या, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाबद्दल कुरधुंडा व मानसकोंड ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीला कुरधुंडा ग्रामपंचायतीचे सरपंच सबा अलजी, उपसरपंच तैमुर अलजी, जमूरत अलजी, नाझिमा बांगी, रमजान गोलंदाज, उस्मान मालगुंडकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Immediately stop borewell blasting on highways, compensate those whose houses are cracked; Orders of Collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.