मुसळधार पावसाच्या साक्षीने गणपतींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:34 AM2021-09-21T04:34:58+5:302021-09-21T04:34:58+5:30
अडरे : रविवारी अनंत चतुर्दशीला मुसळधार पावसाच्या साक्षीने गणरायांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी ना मोठ्या मिरवणुका होत्या, ना ढोल ...
अडरे : रविवारी अनंत चतुर्दशीला मुसळधार पावसाच्या साक्षीने गणरायांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी ना मोठ्या मिरवणुका होत्या, ना ढोल ताशे, ना जल्लोष. भक्तिमय वातावरणात आणि मुसळधार पावसात छोट्या-छोट्या मिरवणुका निघाल्या होत्या.
चिपळूणमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. चिपळूण शहरात चिपळूण सार्वजनिक गणेशोत्सव, नवसाचा चिपळूणचा राजा, भाजीमंडई गणेशोत्सव, चिपळूण नगरपालिका गणेशोत्सव, चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव, कोकणचा राजा गणेशोत्सव, सार्वजनिक बांधकाम, महावितरण तसेच खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेशोत्सव असे मोठे सार्वजनिक गणेशोत्सव येथे साजरे केले जातात. दरवर्षी या गणेशोत्सवात विविध देखावे आणि सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रम १० दिवस सुरू असतात. परंतु यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या उत्सवावर अनेक निर्बंध आले आणि भक्तांच्या आनंदावर विरजण पडले.
चिपळूणमधील काही सार्वजनिक गणेशोत्सव यावेळी रद्द करण्यात आले तर काही मंडळांनी दीड दिवसांनंतरच विसर्जन केले. त्यामुळे अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यासाठी काही मोजकेच गणपती राहिले होते. यावेळी घरगुती गणपतींची संख्याही फार कमी होती. त्यामुळे विसर्जन घाटावर शांतता होती.
सायंकाळी ६ नंतर विसर्जनाची लगबग सुरू झाली. चिपळूण शहरातील नवसाचा चिपळूणचा राजा तसेच चिपळूणचा महाराजा या दोन मोठ्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका काहीशा उशिरा सुरू झाल्या. परंतु प्रचंड उत्साह होता. कोणतेही वाद्य किंवा जास्त गर्दी नसली तरी प्रचंड उत्साहात आणि नियमावलीचे पालन करून विसर्जन घाटावर जात विसर्जन करण्यात आले. चिपळूण नगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणपतीचे सर्वात अगोदर दुपारीच विसर्जन करण्यात आले व सर्व कर्मचारी, अधिकारी शहरात विसर्जनाच्या कामात गुंतले होते.
शहरातील बाजारपूल विसर्जन घाट तसेच बहादूरशेख विसर्जन घाट, पाग विसर्जन घाट या महत्त्वाच्या ठिकाणी यावेळी विसर्जन केले जात होते. विसर्जनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिपळूण नगरपालिकेनेही विसर्जनासाठी चोख व्यवस्था ठेवली होती.