बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!, रत्नागिरी जिल्ह्यातील एक लाख १४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 12:47 PM2022-09-06T12:47:54+5:302022-09-06T12:48:23+5:30

भाविकांना विसर्जन करण्यासाठी नगर परिषदेतर्फे खास कर्मचारी उपलब्ध केले होते. भाविकांनी गर्दीत जाण्याऐवजी जवळच्या कुत्रिम तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन केले.

Immersion of one lakh 14 thousand Ganesha idols in Ratnagiri district | बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!, रत्नागिरी जिल्ह्यातील एक लाख १४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!, रत्नागिरी जिल्ह्यातील एक लाख १४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

Next

रत्नागिरी : गेले सहा दिवस उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता बाप्पाच्या विसर्जनाने झाली. मिरवणूका, वाद्यवृंदाना परवानगी असल्याने यावर्षी भाविकांचा जल्लोष अधिक होता. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयजयकारात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ९६५ गणेशमूर्तींचे गौरींसह विसर्जन करण्यात आले.

भाद्रपद चतुर्थीला १ लाख ६५ हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेले सहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ९६५ गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याने शहरातील मांडवीसह जिल्ह्यातील प्रमुख विसर्जनस्थळांवर पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी आरतीनंतर अनेक भाविकांनी गणेशमूर्ती मखरातून बाहेर काढल्या होत्या. सकाळी पावसाची सर बरसली मात्र दिवसभर विश्रांती घेतल्याने यावर्षी भाविकांनी गणेश विसर्जन मिरवणूका काढल्या. गुलालाची उधळण करीत बेंजो, ढोल ताशा पथक, लेझीम पथकासह मिरवणूका काढण्यात आल्या.

आबालवृध्दांनी वाद्यवृंदाच्या तालावर थिरकण्याचा आनंद घेतला. रिक्षा, कार, बोलेरो आदि वाहनातून गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येत होत्या. काही भाविक निरोपाची आरती घरून करून आले होते तर काही भाविकांनी विसर्जन घाटावर आरती केली. शहरातील मांडवी किनाऱ्यावर विसर्जनासाठी भाविकांची दुपारपासूनच ये-जा सुरू होती. विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. आरती झालेनंतर मूर्ती विसर्जन करणाऱ्या मंडळीकडे सुपूर्द करण्यात येत होती. निर्माल्य संकलनासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. नगर परिषदेकडून मांडवी किनाऱ्यावर कलशकुंड ठेवले होते. शिवाय गाड्याही तैनात ठेवल्या होत्या.

विसर्जनासाठी कुत्रिम तलावाची उपलब्धता

माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत जिल्ह्यात चार नगर परिषद व पाच नगर पंचायतीतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संरक्षणासाठी विसर्जनासाठी कुत्रिम तलावाची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती. रत्नागिरी नगरपरिषदेतर्फेही शहरात विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती. माळनाका व्यायामशाळा, लक्ष्मीचौक उद्यान गाडीतळ, अनंत कान्हेरे उद्यान जयस्तंभ, विश्वनगर उद्यान याठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. भाविकांना विसर्जन करण्यासाठी नगर परिषदेतर्फे खास कर्मचारी उपलब्ध केले होते. भाविकांनी गर्दीत जाण्याऐवजी जवळच्या कुत्रिम तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन केले.

Web Title: Immersion of one lakh 14 thousand Ganesha idols in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.