किराणा खरेदीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:30 AM2021-05-16T04:30:46+5:302021-05-16T04:30:46+5:30

कांद्यासाठी मागणी कांद्याच्या दरात मात्र चढाओढ सुरू आहे. १५ ते २० रुपये किलो दराने कांद्याची विक्री सुरू आहे. बटाटा ...

Impact on grocery shopping | किराणा खरेदीवर परिणाम

किराणा खरेदीवर परिणाम

Next

कांद्यासाठी मागणी

कांद्याच्या दरात मात्र चढाओढ सुरू आहे. १५ ते २० रुपये किलो दराने कांद्याची विक्री सुरू आहे. बटाटा २५ रुपये, तर लसूण १०० ते १५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. कांद्याच्या किमती पावसाळ्यात वधारत असल्याने कांद्यांची खरेदी प्राधान्याने केली जाते. दारावर कांदे विक्रेत्यांच्या गाड्या येत असल्याने खरेदी सोपी झाली आहे. गेल्या वर्षीपासून आठवडी बाजार बंद असल्याने थोडीथोडी खरेदी करून कांदा, बटाटा, लसूण साठवणे अशक्य झाले आहे. दररोजच्या स्वयंपाकात कांदा, लसूण, बटाट्याचा वापर केला जात असल्याने कांदा, लसूण, तसेच बटाटा खरेदी करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यातील शेतकरी कांदा, लसूण, बटाटे विक्रीसाठी आणण्याचे प्रमाण घटले आहे. आंबे घेऊन जाणाऱ्या गाड्यांतून कांदा विक्रीसाठी आणला जात आहे. त्यामुळे कांदा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. कांद्याचे १० किलोचे पोते उपलब्ध आहे. पावसाळ्यासाठी ५० किलोचे पोते खरेदी करण्यात येत आहे. काही कुटुंबे दोन किंवा तिघांमध्ये मिळून कांदा पोते खरेदी करीत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत बटाट्याचे दर चांगलेच वधारले आहेत. बटाटा टिकत नसल्यामुळे मोजकीच खरेदी करण्यात येत आहे. मात्र, आर्थिक चणचण असल्यामुळे खरेदीवर परिणाम झाला आहे.

सुक्या माशांची कमतरता

पावसाळ्यात मासेमारी दोन महिने बंद असल्याने खवय्यांची सुक्या माशांना अधिक पसंती असते. त्यामुळे पावसाळ्यासाठी सुक्या माशांची खरेदी आवर्जून केली जाते; परंतु लॉकडाऊनमुळे बाजार बंद असल्यामुळे सुके मासे उपलब्ध होणे अवघड झाले आहे; परंतु काही विक्रेते ऑनलाइन मागणी नोंदवून सुके मासे ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत. जवळा (कोलीम) २५० ते ३५० रु., बोंबील ४५० ते ५०० रु., काड ५०० ते ५५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. शिवाय बारीक सुकटे १५० ते २५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. खारवलेली सुरमई, बांगडे बळ्याची सुकटे, शिवाय ढोमी माशांच्या सुकटांना विशेष मागणी होत आहे. १५० ते २०० रुपये शेकडा दराने सुकटांची विक्री सुरू आहे.

पापड, फेण्या आता रेडिमेड

नियमितच्या भोजनात भाजी आमटीबरोबर चवीला पापड लागतो. बाजारात तयार पापड विक्रीस उपलब्ध असले तरी घरोघरी पापड, कुरडया, फेण्याचा घाट घातला जातो. पूर्वीच्या तुलनेत त्याचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. करण्यासाठी लागणारा अवधी व वाळविण्यासाठी अंगण नसल्यामुळे तयार पापड, फेण्या विकत घेतल्या जातात. तयार पापड महाग पडत असल्याने तयार पीठ आणून पापड लाटले जातात. पापड २५० ते ३०० रुपये किलो, तर पापड पीठ २५० ते ३०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. पालक, बटाटा, पोहा, नाचणी, उडीद, तांदूळ, साबुदाणा आदी विविध प्रकारचे, निरनिराळ्या स्वादातील पापड उपलब्ध आहेत. याशिवाय फेण्या, कुरडया, शेवया, सांडगे बचत गटाच्या माध्यमातून विक्रीस उपलब्ध आहेत. दहा ते वीस रुपये किमतीला छोटी पाकिटे मिळत असल्याने तयार पाकिटेच खरेदी केली जात आहेत. लोणच्याचा तयार मसाला बाजारात विक्रीला असला तरी विविध प्रकारची निरनिराळ्या कंपनीचे लोणचे बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. त्यामुळे वर्षभर पुरेल इतके लोणचे घालण्याचे प्रकार थांबले आहेत. आवडीनुसार लोणचे विक्रीस आणले जात आहे. शिवाय छोट्या बरण्या, पाऊच उपलब्ध होत असल्याने सोयीस्कर ठरत आहे.

Web Title: Impact on grocery shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.