कोकणी मेवा विक्रीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:28 AM2021-04-19T04:28:24+5:302021-04-19T04:28:24+5:30
ग्रामसमित्या कार्यान्वित रत्नागिरी : कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वीप्रमाणे प्रत्येक गावातील व शहरातील ग्राम व वाॅर्ड सनियंत्रण समिती ...
ग्रामसमित्या कार्यान्वित
रत्नागिरी : कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वीप्रमाणे प्रत्येक गावातील व शहरातील ग्राम व वाॅर्ड सनियंत्रण समिती कार्यान्वित करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून आरोग्य तपासणी करण्याची सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिल्पा नाईकचे यश
दापोली : ‘होय आम्ही शेतकरी’ फाऊंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय फळे आणि भाजीपाला केक स्पर्धेत येथील डाॅ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठातील कनिष्ठ संशोधन सहाय्यक शिल्पा नाईक यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. राज्यभरातून १३०० पेक्षा अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते.
सभेसाठी मुदतवाढ
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा दि.३१ डिसेंबरपर्यंत घेण्याची मुदत देण्यात आली आहे. सहकार कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थांनी आपल्या कारभाराचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. संस्थांनी सप्टेंबर अखेर वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन वार्षिक लेखा परीक्षण अहवालास मंजुरी घेणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी
रत्नागिरी : जिल्हा नियोजनच्या निधीपैकी सर्व ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी मिळणार आहे. त्यामुळे गावांमध्ये विकासकामे होणार आहेत. विशेष म्हणजे या निधीतील सर्वाधिक ८० टक्के भाग ग्रामपंचायतींना विकासकामासाठी प्राप्त होणार आहे. उर्वरित निधीपैकी १० टक्के निधी हा जिल्हा परिषदेस तर १० टक्के निधी हा पंचायत समित्यांना मिळणार आहे.
नागरिकांनी संयम ठेवावा
रत्नागिरी : संयम ठेवा, काळजी घ्या, संकटाचे हेही दिवस जातील. कोरोना रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसताच जवळच्या दवाखान्यात तपासणी करून घ्या.
नागरिकांची गैरसोय
रत्नागिरी : शहरात रस्त्यालगत भाजी, फळे विक्रीसाठी प्रशासनाने बंदी केली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. किराणा दुकानेही बंद आहेत. घरपोच सेवा देणारे विक्रेते कमी असल्याने घरातील उपलब्ध साहित्यावर नागरिकांना अवलंबून रहावे लागत आहे.
साथीचा धसका
रत्नागिरी : तापसरी, सर्दी,पडसे आदी साथरोगांचा धसका नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे साधा ताप असला तरी डाॅक्टरांकडे जाणे नागरिक टाळू लागले आहेत. परिचित डाॅक्टर किंवा औषध विक्रेत्यांकडून औषधे घेऊन आजारावर मात करीत आहेत. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.