हवामानातील बदलाचा आंबा पिकावर परिणाम, थंडी पडूनही नवीन मोहोर नाही; बागायतदार चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:54 AM2023-01-24T11:54:14+5:302023-01-24T11:56:15+5:30
जानेवारी संपत आला तरी नवीन मोहोर येण्यास अजून सुरुवात झालेली नाही. शिवाय अधूनमधून थंडीही गायब असल्याने बागायतदारांसमोर समस्या
रत्नागिरी : जगभरात प्रसिद्ध हापूसच्या उत्पादनावर हवामानातील बदलाचा परिणाम होत आहे. पहिल्या टप्प्यात जेमतेम दहा टक्केच आंबा आला असून, थंडी चांगली पडूनही अद्याप नवीन मोहोर नसल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे.
यावर्षी पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण अधिक होते. ९० टक्के झाडांना पालवी होती. जेमतेम दहा टक्केच मोहोर होता. या मोहोराचा आंबा १५ मार्चपर्यंत बाजारात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा १५ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत असेल. हा आंबा सध्या सुपारी ते सफरचंदाच्या आकाराचा आहे.
डिसेंबरमध्ये थंडी गायब होती. जानेवारीत थंडी सुरू झाली. आठवडाभर थंडीचा जोर कायम आहे. परंतु, मध्येच ढगाळ हवामान, उष्मा, परत थंडी असे विचित्र हवामान असल्याने दुसऱ्या टप्प्यात मोहोर आलाच नाही. जानेवारी संपत आला तरी नवीन मोहोर येण्यास अजून सुरुवात झालेली नाही. शिवाय अधूनमधून थंडीही गायब असल्याने बागायतदारांसमोर समस्या निर्माण झाली आहे. अनेक बागांमधील पालवी जुनी झाली असून, मोहर येणे गरजेचे आहे.
हवामानातील बदलामुळे तुडतुडा, थ्रीप्स, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हवामानातील बदलाचा अंदाज घेत बागायतदारांनी महागडी कीटकनाशके वापरून पालवीचे संरक्षण केले आहे.
जानेवारीत कडाक्याची थंडी सुरू झाली. परंतु मध्येच थंडी गायब होत आहे. फेब्रुवारीपर्यंत तरी मोहर येणे आवश्यक आहे. अन्यथा बागायतदारांसह मजुरांवरही उपासमारीची वेळ येणार आहे. अनेक बागायतदार आंबा काढण्यासाठी बागा किंवा झाडे कराराने घेतात. मात्र, माेहोरच नसल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे.
अनेक बागा कोऱ्या
पालवी मोठ्या प्रमाणावर असल्याने महागडी कीटकनाशके वापरून कीडरोग, बुरशीपासून पालवीचे संरक्षण करण्यात बागायतदार यशस्वी ठरले. पालवी जुनी झाली असून पानांचा रंग बदलला आहे. मात्र मोहोर सुरू न झाल्याने बागा अद्याप कोऱ्याच आहेत. पुरेशी थंडी नसल्यामुळे मोहोर प्रक्रिया सुरू झालेली नाही.
हवामानातील बदलाचा आंबा पिकावर होणारा परिणाम व आंबा पीक वाचविण्यासाठी येणारा खर्च यामुळे आंबा पीक खर्चीक बनत आहे. तुलनेने आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावू लागले आहे. शिवाय अपेक्षित दरही मिळत नसल्याने आर्थिक गणिते कोलमडत आहेत. कीटकनाशकांचे दर मात्र वाढतच आहेत. त्यामुळे शासनाने आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत विचारविनिमय करणे आवश्यक आहे. - राजन कदम, बागायतदार.