शेंगदाणा तेल साेडून बाेला; शेंगदाणा दर वाढीचा तेलाच्या किंमतीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 06:46 PM2021-11-21T18:46:12+5:302021-11-21T18:46:35+5:30
मेहरून नाकाडे रत्नागिरी : सोयाबीन, सूर्यफूल, सरकी, पाम, कापूस तेलाचा वापर स्वयंपाकासाठी सर्रास केला जात असला तरी शेंगदाणा तेलालाही ...
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : सोयाबीन, सूर्यफूल, सरकी, पाम, कापूस तेलाचा वापर स्वयंपाकासाठी सर्रास केला जात असला तरी शेंगदाणा तेलालाही सर्वाधिक पसंती आहे. काही ग्राहक रिफाईंड तेल वापरत असले तरी घाण्यावरच्या तेलाचा खपही अधिक आहे. शेंगदाणा तेलामुळे पदार्थाची चव वाढते असा खवय्यांचा दावा असल्यानेच शेंगदाणा तेलाचा वापर केला जातो. मात्र गेल्या तीन महिन्यात तेलाच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली आहे. अन्य तेलाच्या तुलनेत शेंगदाणा तेलाचे दर मात्र अधिक आहेत.
कच्च्या खाद्यतेलावरील आयात कर, कृषीभार (सेस) रद्द करण्यात आल्याने खाद्यतेलाचे दर नियंत्रित आले आहेत.
उत्पादनावरील परिणामामुळे दरवाढ
- इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढत आहे. शिवाय पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनावर परिणाम झाल्याने शेंगदाणा तेलाचे दर अन्य तेलाच्या तुलनेत सरस आहेत.
- सूर्यफूल तेलाचे दर दोनशेच्या घरात गेले होते, मात्र आता दर बऱ्यापैकी नियंत्रणात आहेत. त्यामुळे परवडेल असेच खाद्यतेल ग्राहक वापरत आहेत. सोयाबीन, कापूस, पामतेलाचेही दर खाली आले आहेत.
खाद्यतेलाचे दर (लीटर)
तेल १५ सप्टेंबर १५ ऑक्टाेबर १५ नाेव्हेंबर
शेंगदाणा १८५ ते १९० १७० ते १७५ १७०
साेयाबीन १५५ ते १६० १४० ते १४५ १४०
सूर्यफूल १८० ते १८५ १४५ ते १५५ १५५
सरकी १३० ते १३५ १२५ ते १३० १३०
पाम १४० ते १४५ १२० ते १२५ १२५
कापूस १३५ ते १४० १४० १४०
वेगवेगळे तेल खाणे आराेग्यदायी
- पदार्थाची चव व स्वाद यासाठी शेंगदाणा तेल वापरले जात असले तरी सूर्यफुलाच्या तेलाला ग्राहकांकडून आरोग्यदृष्ट्या पसंती होत आहे.
- कापूस तसेच भाताच्या कोंड्यापासून तयार केलेल्या तेलाचाही वापर करण्यात येतो.
- सोयाबीनच्या तेलालाही वाढती मागणी आहे. मोजमजुरी करणाऱ्या वर्गाकडून पामतेलाचा वापर होत आहे.