शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा : सुशीलकुमार पावरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:33 AM2021-03-27T04:33:17+5:302021-03-27T04:33:17+5:30
दापोली : शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा,अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष आणि काेकण विभागप्रमुख सुशीलकुमार पावरा ...
दापोली : शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा,अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष आणि काेकण विभागप्रमुख सुशीलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र व रत्नागिरी जिल्ह्यात सन २००५ नंतर नोकरीला लागलेल्या सर्व विभागांतील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. अशांना अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली हाेती. ती योजनाही आता बंद करण्यात आली असून जमा झालेल्या रकमेचा हिशोब कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही. २००५ पूर्वी लागलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. जुन्या लोकांच्या बरोबरीनेच नवीन कर्मचारी हे काम करत असतात. तेव्हा २००५ पूर्वी लागलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणे व २००५ नंतर लागलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्याेना जुनी पेन्शन बंद करणे, हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
म्हातारपणी आपल्या उदरनिर्वाहासाठी पेन्शन हाच आधार असतो. तो आधारच शासनाने बंद केला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून ठिकठिकाणी उपोषण व आंदोलनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी मागणी करत आहेत. तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन २००५ नंतर नोकरीला लागलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.