लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांसाठी टोकन पद्धत राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:32 AM2021-05-09T04:32:10+5:302021-05-09T04:32:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : ग्रामीण भागात लसीकरणच्या नियोजनाअभावी ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रांवर रांगा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : ग्रामीण भागात लसीकरणच्या नियोजनाअभावी ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रांवर रांगा लावूनही शेवटी लस नाही, असे सांगितले जात आहे. परिणामी, होणारा लसीचा पुरवठा आणि दिली जाणारी लस याचे नियोजन करून ज्येष्ठ नागरिकांना टोकन दिल्यास गर्दी टाळता येईल, अशी मागणी गाव विकास समितीच्या रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
ग्रामीण भागात ज्या ४५ वर्षांवरील नागरिकांनी पहिला डोस घेतला, त्यांच्या दुसऱ्या डोसची मुदत होऊन गेली, तरी अद्याप दुसरा डोस मिळत नाही. दुसरा डोस कधी मिळेल, याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिक सकाळीच लसीकरण केंद्रांवर रांगा लावत आहेत. देवरुखसारख्या तालुक्याच्या ठिकाणी लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने, अनेकांना रांगेत उभे राहिल्यानंतर ही लस न घेता माघारी जावे लागत आहे. लसीचा दुसरा डोस पूर्ण व्हावा, यासाठी ज्येष्ठ नागरिकांत गांभीर्य असताना, लस देण्याबाबत नियोजन नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ज्या ठिकाणी डोस साठी गर्दी होत आहे, जेथील मागणी अधिक आहे, तिथे लसीकरणाची संख्या वाढवायला हवी, गर्दी टाळण्यासाठी आणि डोस कधी मिळणार, याची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी नियाेजन करावे, तसेच ज्येष्ठांना लस कधी मिळणार याबाबत त्या-त्या केंद्रांवर नियोजन करून टोकन, द्यावे अशी मागणी सुहास खंडागळे यांनी केली आहे.