अंमलबजावणी जलद होणे आवश्यक
By admin | Published: March 18, 2015 10:12 PM2015-03-18T22:12:50+5:302015-03-19T00:02:27+5:30
जया सांगडे : कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याबाबत रत्नागिरीत कार्यशाळा
रत्नागिरी : कायद्याने नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या, भूमिका आणि कामे पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व संरक्षण अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने व अधिक सजगतेने निभावल्यास कौटुुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व जलद गतीने होणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील महिला अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. जया सांगडे यांनी रत्नागिरी येथे केले.महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम २००५ या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व संरक्षण अधिकारी, सेवा पुरवणारे, पोलीस उपनिरीक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी दोन दिवसांची कार्यशाळा रत्नागिरी येथे पार पडली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. सांगडे बोलत होत्या.कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जे. एस. शेख यांच्याहस्ते झाले. या कार्यशाळेसाठी स्वीस एड इंडिया, पुणे व हेरिटेज कल्चर आर्ट अॅण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, लांजा यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यशाळेचे संयोजन हेरिटेज कल्चर संस्थेने केले होते.
कार्यशाळेत महिला अभ्यास केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक प्रसन्ना इनवली, प्रसिद्ध स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या अर्चना मोरे यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम २००५ विषयी दोन दिवस विस्ताराने मार्गदर्शन केले. कार्यशाळेत कौटुंबिक हिंसाचार कायदा व लिंग समभाव याबाबत अर्चना मोरे यांनी, कायद्याचा उद्देश, तरतुदी व प्राथमिक कार्यवाही, पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका याबाबत जया सांगडे यांनी तर संरक्षण अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रसन्ना इनवली यांनी मार्गदर्शन केले. कौटुंबिक घटना अहवाल, अर्ज क्र. ४, १, ३ व कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम २००५ अन्वये प्रकरणदाखल करताना घ्यावयाची काळजी याबाबतही जया सांगडे, अर्चना मोरे व प्रसन्ना इनवली यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाचे प्रतिनिधी, सर्व संरक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्पाचे अधिकारी व पर्यवेक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्षाच्या प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी हेरिटेजचे अध्यक्ष संतोष कांबळे, ट्रस्टी अपर्णा पवार, संकेत नामये, संतोष गायकवाड, महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)