रत्नागिरीत भोंग्याच्या आवाजाच्या नियंत्रणासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 06:53 PM2022-04-29T18:53:47+5:302022-04-29T18:55:27+5:30
राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय गाजत असतानाच रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी : राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय गाजत असतानाच रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रत्नागिरी शहर पोलीस स्थानकांतर्गत शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वधर्मीय लोक एकोप्याने राहतात. त्यांच्यातील हा सलोखा कायम राहावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीकरांना केले आहे. पोलीस मुख्यालयात शांतता कमिटीची बैठक आयाेजित केली हाेती. यावेळी ३ मे रोजी रमजान ईद, अक्षय तृतीया हे दोन सण साजरे करण्यात येणार आहेत.
यावेळी मुस्लिम समाजातर्फे रफिक बिजापूरकर यांनी भोंग्यांचा आवाज मर्यादित ठेवणारी अत्याधुनिक यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. यामध्ये पहाटेच्या सुमारास अत्यंत कमी वेळात व कमी आवाजात अजान दिली जाईल तर इतर वेळीही मर्यादित आवाजात अजान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत होणार असल्याचे रफिक बिजापूरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अमोल श्रीनाथ यांनीही रत्नागिरीत हिंदू-मुस्लिम बांधव लहानपणापासून एकत्रित राहत आहेत. भोंग्याचा आवाज मर्यादित झाल्यास मनसेचा कोणताही आक्षेप नाही. आम्ही सर्व समाजाचे बांधव एकत्रितपणे आमचे सण, उत्सव साजरे करणार असल्याचे स्पष्ट केले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध धर्माचे, जातीचे लोक वास्तव्याला आहेत. परजिल्ह्यासह राज्यात, देशात कोणतीही अनुचित घटना घडली तरीही येथील सर्वधर्मीयांचा सलोखा यापूर्वीही कायम राहिला आहे, यापुढेही कायम राहील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
या बैठकीला श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्ना सुर्वे, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, आरपीआयचे एल. व्ही. पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नीलेश भोसले, व्यावसायिक महेश गुंदेचा, मराठा मंडळाचे केशवराव इंदुलकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर तर पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) शिवाजी पाटील, शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस हेड काॅन्स्टेबल महेश कुबडे, कर्मचारी नेते सुधाकर सावंत, सतीश राणे, पत्रकार राजेंद्र चव्हाण, हेमंत वणजू, तन्मय दाते आदी उपस्थित होते.