चिपळुणातील सावकारीच्या धाडीत महत्त्वाचे दस्तऐवज हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:31+5:302021-07-07T04:38:31+5:30
चिपळूण : सावकारांच्या कार्यालयावर आणि घरावर टाकलेल्या धाडीत सहायक निबंधकांना कोरे धनादेश, कोरे बाँड, रेशनकार्ड, वाहनांचे आरसी बुक आणि ...
चिपळूण : सावकारांच्या कार्यालयावर आणि घरावर टाकलेल्या धाडीत सहायक निबंधकांना कोरे धनादेश, कोरे बाँड, रेशनकार्ड, वाहनांचे आरसी बुक आणि काही वाहनांच्या किल्ल्या असे महत्त्वाचे दस्तऐवज हाती लागले आहेत. त्यानुसार आता निबंधक कार्यालयाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे, तसेच अन्य परवानाधारक सावकारी करणाऱ्यांनाही थेट नोटीस पाठवून अहवाल मागवण्यात आला असून, त्यांचीही सखोल चौकशी होणार आहे.
चिपळूणमध्ये उधळलेल्या सावकारीला आता वेसण घालण्याचे काम सर्व बाजूने सुरू झाले आहे. अभिजित गुरव याची आत्महत्या, परकार यांनी केलेली तक्रार आणि जनतेचा संताप बघता चिपळूण पोलीस आणि सहायक निबंधक कार्यालयाने गंभीर दखल घेत जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शिवा खंडजोडे, चांगदेव खंडजोडे आणि पूजा मिरगल या तिघांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
कर्जदारांचे कोरे धनादेश आणि बाँड, तसेच वाहनांची आरसी बुक व वाहनांच्या चाव्या हाती लागल्या असून हे सर्व कर्जदारांकडून सावकारांनी जप्त केलेले दस्तऐवज असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नियमांचा भंग केल्याप्रकरणी आता निबंधक कार्यालयाकडूनदेखील त्या दोघांवर वेगळी कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्या सावकारांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. कर्ज मर्यादा किती, कर्ज वाटप किती, वसुलीचा रीतसर पावत्या, रजिस्टर नोंद आणि त्यांची एकूण संपत्ती याची देखील तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये अनियमितता आढळली किंवा एखाद्या कर्जदाराने तशी तक्रार केली तर मात्र कठोर कारवाई होईल, अशी माहिती देखील सहायक निबंधक रोहिदास बांगर यांनी दिली आहे.
कोट
चिपळुणात सावकारीचे अधिकृत परवानाधारक १७ जण आहेत. सावकारी नियमानुसार कृषी कर्ज तारण असेल तर ९ टक्के दराने, विनातारण १२ दराने, तसेच तारण स्वरूपात वैयक्तिक कर्ज १५ टक्के दराने व विना तारण कर्ज १८ टक्के दराने ( दर साल दर शेकडा प्रमाणे) देता येते. त्यासाठी कोणत्याही कर्जदाराकडून कोरा धनादेश, कोरा बाँड असे कागदपत्रे घेता येत नाहीत, तसेच कर्जदारास कर्जाची पावती व भरणा केलेल्या रकमेची पावती देणे बंधनकारक आहे.
रोहिदास बांगर, सहायक निबंधक, चिपळूण.