संस्कृत भाषेच्या जपणुकीसाठी रत्नागिरीतून महत्त्वाचे पाऊल : उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:35 AM2021-09-26T04:35:06+5:302021-09-26T04:35:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : संस्कृत विषयाकडे हमखास गुण मिळविण्याचा विषय म्हणून पाहिले जाते; परंतु, त्या पलीकडे जाऊन संस्कृत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : संस्कृत विषयाकडे हमखास गुण मिळविण्याचा विषय म्हणून पाहिले जाते; परंतु, त्या पलीकडे जाऊन संस्कृत भाषा जपली पाहिजे. या भाषेच्या जपणुकीसाठी काेकणातील रत्नागिरीतून महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी शहरातील उपकेंद्रांचे शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते, तर रत्नागिरी येथील उपकेंद्रांच्या सभागृहात पार पडलेल्या या साेहळ्याला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य ज्योत्स्ना ठाकूर, कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती, वित्त व लेखा अधिकारी रामचंद्र जोशी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आपले वेद वाङमय संस्कृतमध्ये आहे. ते समजून घेण्यासाठी या भाषेवर प्रभुत्व मिळविता आले नाही तरी या भाषेचे किमान ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे. संस्कृत ही अनेक भाषांची जननी असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणातील रत्नागिरीमध्ये या भाषेच्या जपणुकीसाठी एक महत्त्वाचे पाऊल कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या उपकेंद्राच्या माध्यमातून पडत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. आपण माणूस म्हणून इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे संस्कृत आपल्याला सांगते, असेही ते म्हणाले. संस्कृत भाषा मनामनांत जागविली गेली तर आपल्याला आपली संस्कृती कळेल व आपल्यावर चांगले संस्कार होतील. त्यामुळे केवळ भाषांतर किंवा पाठांतरापुरता संस्कृतचा विचार न करता या भाषेतील ज्ञान आणि संस्कार प्रत्येकाच्या मनात बिंबविले गेले पाहिजेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संस्कृत विद्यापीठ व उपकेंद्राच्या भविष्यातील कामासाठी शासन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. तसेच संस्कृत आणि संस्कृती जपण्यासाठी आपण सर्व मिळून पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी या उपकेंद्रासाठी विशेष प्रयत्न करणारे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांचा वेगवेगळ्या संस्थांकडून सत्कार करणयात आला.