उत्पादकता वाढविण्याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा : संजय सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:32 AM2021-09-19T04:32:14+5:302021-09-19T04:32:14+5:30
दापोली : शाश्वत शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी जैवतंत्रज्ञान, सूक्ष्म जीवशास्त्र व नॅनो तंत्रज्ञान यांचा प्राधान्याने वापर करण्याबाबत कुलगुरूरु डॉ. संजय ...
दापोली : शाश्वत शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी जैवतंत्रज्ञान, सूक्ष्म जीवशास्त्र व नॅनो तंत्रज्ञान यांचा प्राधान्याने वापर करण्याबाबत कुलगुरूरु डॉ. संजय सावंत यांनी आवाहन केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असून, यानिमित्त विद्यापीठामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. याचाच एक भाग म्हणून वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्रामार्फत जैवतंत्रज्ञान, सूक्ष्म जीवशास्त्र आणि नॅनो तंत्रज्ञानाच्या आधारे पीक सुधारणा या २१ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे, त्यावेळी ते बाेलत हाेते.
यावेळी शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे यांनी प्रशिक्षणाचे कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व अधोरेखित केले. व्यावसायिक संधी उपलब्ध होण्याबाबत व शेतीतील प्रगत तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थींना या प्रशिक्षण वर्गाचा निश्चित फायदा होईल, असे प्रतिपादन सहयाेगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर यांनी केले. पारंपरिक शेतीला औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक फायदा मिळू शकतो व याबाबत कोकणात व्यावसायिक पातळीवर प्रयत्न व्हावे, असे मत प्रमुख पाहुणे डॉ. सिद्धिविनायक बर्वे यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षपदी कुलगुरू डॉ. संजय सावंत, वझे शिक्षण संस्था, मुलुंडचे डॉ. सिद्धिविनायक बर्वे उपस्थित होते. या कार्यक्रमास ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील इतर कृषी विद्यापीठातील विद्यार्थी व संशोधक सहभागी झाले होते. एकूण १३४ विद्यार्थी व तांत्रिक अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षण वर्गासाठी नोंदणी केली आहे. प्रशिक्षणाचा कालावधी २१ दिवसांचा असून, प्रशिक्षण ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्रशिक्षणाचे आयोजक डॉ. संतोष सावर्डेकर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. रवींद्र देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोहित शिंगे आणि संदीप शेरकर यांनी प्रयत्न केले.