रत्नागिरीत उद्या 'या' मार्गावरील वाहतूक बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणता..जाणून घ्या
By शोभना कांबळे | Published: April 13, 2023 04:13 PM2023-04-13T16:13:14+5:302023-04-13T16:25:32+5:30
सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार
रत्नागिरी : बाैद्धजन पंचायत समिती, रत्नागिरीतर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल राेजी कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजाराे अनुयायी हजर राहणार आहेत. त्यामुळे दि. १४ राेजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालय ते जयस्तंभ मार्गाने बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे हजारो मोठ्या प्रमाणात एकत्र जमा होतात. याठिकाणी विविध कार्यक्रम होणार असून, मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यादरम्यान रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूने सुरु ठेवल्यास अपघात घडून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरीचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११५ नुसार वाहतुकीला बंदी घातली आहे.
या कालावधीत शासकीय रुग्णालय ते जयस्तंभ या मार्गाने बसस्थानकाकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरीता प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक जेल रोड, गोगटे कॉलेज, स्टेट बँक मार्गे जयस्तंभ व तेथून बसस्थानक या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.