Ratnagiri: रस्त्याला जागा दिली तरीही कुटुंब वाळीत!, अलोरे वरचीवाडी येथील चव्हाण कुटुंबाची कैफियत

By संदीप बांद्रे | Published: December 5, 2023 04:59 PM2023-12-05T16:59:05+5:302023-12-05T16:59:42+5:30

न्याय न मिळाल्यास पंचायत समिती समोर आत्मदहनाचा इशारा

In spite of giving way to the road the family, The mood of the Chavan family in Alore Varchiwadi | Ratnagiri: रस्त्याला जागा दिली तरीही कुटुंब वाळीत!, अलोरे वरचीवाडी येथील चव्हाण कुटुंबाची कैफियत

Ratnagiri: रस्त्याला जागा दिली तरीही कुटुंब वाळीत!, अलोरे वरचीवाडी येथील चव्हाण कुटुंबाची कैफियत

चिपळूण : अलोरे वरचीवाडी येथे पायवाटेसाठी ६५ मिटर लांबीची ग्रामपंचायतीला तिन ते चार फुटांची जागा विना मोबदला दिली होती. मात्र कुटुंबातील सहहिस्सेदारांच्या सह्या न घेताच त्यांच्या खोट्या सह्या मारण्यात आल्या. शिवाय तिन चार फुटाची जागा दिली असताना १० फूट रस्ता केला जात आहे. वाढीव रस्त्याला आमचा विरोध असून रस्त्यासाठी जागा देत नसल्याने ग्रामस्थांनी आम्हाला वाळीत टाकल्याची कैफीयत अलोरे वरचीवाडी येथील अनंत शंकर चव्हाण दांम्पत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माडंली.

रस्त्याबाबत झालेल्या फसवणूकीबाबत माहिती देताना अनंत चव्हाण म्हणाले की, अलोरे वरचीवाडी येथे पाऊलवाटेसाठी ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार तीन ते चार फुट रूंदीची ६५ मीटर लांब जागा विना मोबदला दिली होती. त्याकरिता आईने व मी कोऱ्या स्टॅंप पेपरवरती सह्या केल्या होत्या. मात्र याच जागेत सहहिस्सेदार असलेल्या बहिणींची संमत्ती घेतली नव्हती. कालांतराने ग्रामपंचायतीकडे असलेल्या रस्त्यांच्या नोंदीबाबत माहिती घेतली असता बहिणींच्या खोट्या सह्या मारून संमत्तीपत्र केल्याचे दिसून आले. 

तत्कालीन सदस्या व विद्यमान सरपंच अंजली अरूण मोहिते यांच्या समक्ष सह्या केल्याचे दाखवले आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तसेच गटविकास अधिकाऱ्यांनाही बहिणींच्या खऱ्या सह्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्षात तीन ते चार फुट पाऊलवाटेसाठी तोंडी संमत्ती असताना ७ ते १० फुटाचा पक्का रस्ता तयार केला जात आहे. त्यासाठी शासनाने डोंगरी विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी या रस्त्यावर खर्च झाला आहे. सुरुवातीला दोघांच्या जागा घेण्याचे ठरले होते. मात्र आता लगतची जागा रस्त्यासाठी न घेता केवळ आपल्या जागेतून पाऊलवाटेचे वाढीव काम केले जात असल्याने जमिन शिल्लक राहत नाही. 

याबाबत गेली दोन वर्षे पंचायत समिती, तहसील स्तरावर सातत्याने पत्रव्यवहार केला जात आहे. उपोषणाची नोटीस दिली, तरी अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. वाढीव रस्त्यासाठी जागा देत नसल्याने दोन्ही वाडीतील ग्रामस्थांनी आमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. वाडीतील कोणत्याही कार्यक्रमांचे निमंत्रण दिले जात नाही. लोकांचे पुर्वीसारखे घरी येणे जाणेही राहिलेले नाही. वाडीतील ग्रामस्थांना हाताशी धरून दडपशाहीची भूमिका केली जात आहे. रस्त्यासाठी बेकायदा केलेले नियमबाह्य असलेले संमत्तीपत्र रद्द करण्यात यावे. गटविकास अधिकाऱ्यांनी आठवड्यात  कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यापुर्वीही पंचायत समितीने आश्वासने दिली होती. मात्र आता न्याय न मिळाल्यास पंचायत समिती समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा अनंत चव्हाण यांनी दिला आहे.

Web Title: In spite of giving way to the road the family, The mood of the Chavan family in Alore Varchiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.