तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीत शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड अन् पत्र हरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 12:48 PM2022-10-29T12:48:07+5:302022-10-29T12:48:34+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी पोस्टाद्वारे आपल्या मतदारांना भेटकार्ड पाठविणे पसंत केले
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : सण, उत्सव म्हटलं की, एकमेकांना शुभेच्छा देणे आलेच. मात्र, आजकाल सोशल मीडियाचा वापर वाढल्याने ग्रीटिंग कार्ड व पत्र पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अकरा दिवसांत २४ हजार कार्डस् आणि पत्रे आली आहेत. मात्र, पूर्वी सुमारे ५० हजार शुभेच्छा पत्र येत होती.
ग्रामीण भागातील संदेश वहनामध्ये आजही पोस्ट खाते प्रभावी माध्यम ठरत आहे. पूर्वी सणाला शुभेच्छा देणारे एकतरी पत्र किंवा ग्रीटिंग कार्ड यायचे. हळूहळू काळ बदलत गेला आणि तंत्रज्ञानाचे युग आले. त्यामुळे एकमेकांना पत्र पाठवून शुभेच्छा देण्याचे प्रमाण कमी झाले. फोनवरून एकमेकांना शुभेच्छा देणे सुरू झाले. त्यातही आता सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की, एक मेसेज टाईप करायचा आणि तो सर्वांना पाठवून द्यायचा, हे वाढले आहे. सोशल मीडियाच्या या वापरामुळे पोस्टाद्वारे शुभेच्छा पत्र किंवा कार्ड पाठविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात १७ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत केवळ २४ हजार शुभेच्छा पत्र दिवाळीच्या काळात आली आहेत. सोशल मीडियामुळे पूर्वीपेक्षा निम्म्यावर हे प्रमाण आले आहे.
आमदारांचीच भेटकार्ड जास्त
साेशल मीडियाचा वापर वाढल्याने पोस्टाने भेटकार्ड पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दुकानातून भेटकार्डची हाेणारी विक्रीही कमी झाली आहे. तरीही काहीजण आजही पोस्टाने भेटकार्ड पाठवून शुभेच्छा देतात. रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी पोस्टाद्वारे आपल्या मतदारांना भेटकार्ड पाठविणे पसंत केले आहे. त्यामुळे पोस्टात आलेल्या भेटकार्डांमध्ये आमदारांचीच भेटकार्ड जास्त आहेत.
५० हजार यायची, आता २४ हजार
रत्नागिरी जिल्हा हा दुर्गम आहे. त्यामुळे संवादासाठी पोस्ट हे एक उत्तम साधन आहे. खेडोपाडी इंटरनेटची समस्या कायम आहे. मुंबई, पुण्यात फास्ट इंटरनेट आहे. पण, ग्रामीण भागात नाही. आजही पोस्ट खाते अविरतपणे आपली सेवा देत आहे. आजही २४ हजार लोकांनी पोस्टाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. पूर्वी ४० ते ५० हजार भेटकार्ड येत होती.
पोस्टाने भेटकार्ड पाठविली जात असली तरी सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे पोस्टापेक्षा सोशल मीडियावरच शुभेच्छांचा वर्षाव अधिक असतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी भाग हा दुर्गम आहे. त्यामुळे पोस्ट प्रभावी ठरते. त्यातही पत्र लिहिणे ही एक कला आहे आणि ती रत्नागिरीकरांकडे जास्त आहे. रत्नागिरीला सांस्कृतिक वारसा असून, ती संस्कृती आजही जपली आहे. त्यामुळेच रत्नागिरीकर आजही पोस्टाने भेटकार्ड पाठवतात. - नंदकुमार कुरळपकर, डाक अधीक्षक, रत्नागिरी