नाटे येथील चोरीप्रकरणी चौघांच्या मुसक्या आवळल्या; तिघांना कर्नाटकमधून तर एकाला मुंबईतून अटक
By अरुण आडिवरेकर | Published: September 17, 2024 04:59 PM2024-09-17T16:59:27+5:302024-09-17T16:59:37+5:30
या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू होता.
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील चोरीप्रकरणी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चौघांच्या मुसक्या आवळल्या. दीड महिन्यातच या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, तिघांना कर्नाटकमधून तर एकाला मुंबईतून अटक केली आहे.
नाटे बाजारपेठेत २० ऑगस्ट २०२४ रोजी झैद मोबाइल व इलेक्टॉनिक्स या दुकानाचे शटर कोणत्यातरी हत्याराने उचकटवून दुकानातून एकूण ४९ मोबाइल, टॅब व अन्य साहित्य असा एकूण ६,८३,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. दुकान मालक नासिर इब्राहिम काझी (रा. जैतापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू होता. गोपनीय माहितीच्या आधारे तसेच नाटे परिसरातील कंत्राटी बांधकाम करणाऱ्या काही व्यक्तींकडे केलेल्या चौकशीमध्ये या गुन्ह्यातील आरोपी हे कर्नाटक व मुंबई येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी लागलीच दोन पथके तयार करून कर्नाटक राज्य व मुंबई या ठिकाणी तपासासाठी पाठविली.
कर्नाटकात एका तपास पथकाने करण हाज्याप्पा पुजारी (वय २६, रा. बाजनगर, सुबानाईक तांडा, नलवार, ता. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक) आणि राहूल रेड्डी चव्हाण (वय २४, रा. बलराम चौक, तलाई तांडा, जि. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक) यांना ताब्यात घेतले. मुंबईमधून प्रेम सपन कर्माकर (वय २२, रा. मोतीला नगर, नंबर १ रोड, गोरेगाव वेस्ट, दत्त मंदिराजवळ) याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सबन्ना भिमराय कोबळा (वय २४, रा. नलवार, ता. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक) याला ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एकूण ४,१३,१७७ रुपये किमतीचे ३३ मोबाइल, १ टॅब असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलिस स्थानकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, पोलिस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, पोलिस हवालदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, नितीन ढोमणे, बाळू पालकर, विक्रम पाटील, अमित कदम, प्रवीण खांबे, गणेश सावंत, रमिज शेख, चालक पोलिस शिपाई अतुल कांबळे तसेच नाटे पोलिस स्थानकाचे हवालदार राकेश बागुल व पोलिस शिपाई चव्हाण यांनी केली आहे.