पक्षवाढीमध्ये आडवा येईल त्याला आडवे करा, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 06:44 PM2022-12-05T18:44:13+5:302022-12-05T18:44:54+5:30
कार्यकर्त्यांला कोणती अडचण आल्यास त्यांच्या पाठीशी वकिलांची फौज व मुंबई येथून कार्यकर्ते पाठवले जातील
लांजा : मनसे पक्षवाढीसाठी कोण आडवा येईल, त्याला आडवे करा. त्यासाठी लागणारी सर्व ताकद दिली जाईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लांजा येथे मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
राज ठाकरे यांनी शनिवारी (३ डिसेंबर) लांजा शहरातील अजिंक्य मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. राज ठाकरे यांचे लांजा शहरामध्ये आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये ‘मनसे स्टॉग’ करण्यासाठी आपण लक्ष केंद्रित केले आहे. काही कार्यकर्ते मुंबईत वेगळ्या पक्षाचे काम करतात व गावी आल्यावर वेगळ्या पक्षाचे काम करतात, हे आपल्या लक्षात आले आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराच त्यांनी या बैठकीत दिला.
कोकणामध्ये काम करताना पक्षाची ध्येयधोरणे व आंदोलन करताना कार्यकर्त्यांला कोणती अडचण आल्यास त्यांच्या पाठीशी वकिलांची फौज व मुंबई येथून कार्यकर्ते पाठवले जातील. स्थानिक कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या समवेत अमित ठाकरे, अरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.