स्वप्नाली सावंत खून प्रकरणात संशयितांविराेधात ठाेस पुरावे हाती, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 01:49 PM2022-10-15T13:49:09+5:302022-10-15T13:49:36+5:30
या तपासामध्ये काही त्रुटी राहू नये, यासाठी तीन समांतर पथके तयार करून हा तपास केला गेला
रत्नागिरी : पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत खून प्रकरणाचा तपास आव्हानात्मक होता. मात्र, पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीमुळे या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद झाले. या तपासामध्ये काही त्रुटी राहू नये, यासाठी तीन समांतर पथके तयार करून हा तपास केला गेला. डीएनएचा अहवालही पाॅझिटिव्ह येईल, असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे अटकेतील संशयित आरोपींना शिक्षा होईल, असे ठोस पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी दिली.
पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी त्यांनी हे स्पष्ट केले. स्वप्नाली सावंत ३० ऑगस्ट राेजी मिऱ्या येथील निवासस्थानी गणेशोत्सवाला गेल्या होत्या. तिथून त्या बेपत्ता झाल्या होत्या. १ सप्टेंबर राेजी पती-पत्नीत वाद झाला. त्यानंतर सुकांत सावंत याने सहकाऱ्यांसह स्वप्नालीचा गळा दाबून खून केला आणि त्याच दिवशी बंगल्याच्या मागील बाजूला तिचा मृतदेह जाळून टाकला होता. पोलिसांनी सुकांत सावंतला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खास शैलीत चौकशी सुरू केल्यानंतर तिची हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांना सुकांत सावंत याच्या मिऱ्या बंदर येथील बंगल्याजवळ मानवी हाडे सापडली होती. मात्र, मिळालेली हाडे ही स्वप्नाली सावंत यांचीच आहेत का, हे तपासण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानुसार बंगल्याबाहेरून मिळवलेली हाडे चाचणीसाठी पोलिसांनी पाठवली. तसेच दातही सापडला आहे. या प्रकरणात तपासासाठी पथक नियुक्त करण्यात आले होते, त्यांनी ठरवून दिलेल्या दिशेने तपास केला. त्यातूनच हा गुन्हा उघडकीस आणण्यात आम्हाला यश मिळाल्याचे पाेलीस अधीक्षक डाॅ. गर्ग यांनी सांगितले.