लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात ४,३०७ शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात
By शोभना कांबळे | Published: April 11, 2024 05:52 PM2024-04-11T17:52:51+5:302024-04-11T17:53:35+5:30
२५५ शस्त्रे अपवादात्मक वगळली
रत्नागिरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी - सिंदुधुर्ग मतदार संघात आत्मसंरक्षण तसेच शेती संरक्षणासाठी असलेल्या एकूण ७,५४८ परवानाधारक शस्त्रांपैकी ४,३०७ शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत. अपवादात्मक काही बॅंका तसेच विशेष व्यक्ती यांना सवलत देण्यात आली असून एकूण २५५ शस्त्रे ही जमा करण्यात आलेली नाहीत.
कोणत्याही निवडणुकीवेळी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी, यासाठी उमेदवार आणि मतदार यांच्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात येते. या आचारसंहितेच्या नियमांचे पालन काटेकोररित्या करण्यासाठी अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांकडे दिली जाते. त्यामुळे निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून ते मत मोजणीपर्यंत आचारसंहितेचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक असते.
निवडणुकीच्या काळात कुठल्याही बाबीमध्ये नागरिक किंवा उमेदवारांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणुन ज्यांच्याकडे शस्त्र आहेत, ती सर्व शस्त्रे पोलिस विभागाकडे जमा करावी लागतात. शस्त्रे बाळगणाऱ्यांना शस्त्रे घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने परवाना मिळतो. त्यासाठी पोलिस विभागाकडून त्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेतली जाते. त्यानंतरच त्याला शस्त्र परवाना मिळतो. शेती संरक्षणासाठी आणि आत्म संरक्षणासाठी अशा दोन प्रकारची शस्त्रे असतात. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदार संघातील एकूण ७,५४८ शस्त्रांपैकी ४,३०७ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील विविध प्रकारची शस्त्रे बाळगणारे ३०८३ शस्त्रधारक आहेत. त्यापैकी २८६६ जणांना शस्त्रे जमा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी २५५९ जणांची शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. बॅंका तसेच अपवादात्मक व्यक्ती अशा २१७ जणांना यातून वगळण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४४६५ शस्त्रधारक आहेत. त्यापैकी ४३८९ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यापैकी २०३५ जणांची शस्त्रे जमा करण्यात आली आहे तर ३८ जणांना सवलत देण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यातील मिळून ७२५५ शस्त्रे बुधवार, दि. १० एप्रिलपर्यंत प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहेत. २५५ जणांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे.
शुक्रवार, दि. १२ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात होणार आहे. तोपर्यंत शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले आहे.