शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे कोरोना रुग्णांचा खासगीकडे ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:32 AM2021-05-19T04:32:55+5:302021-05-19T04:32:55+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात ६ कोरोना रुग्णालये, २४ डी. सी. एच. सी. आणि ३१ सी.सी.सी आहेत. त्यात एकूण बेडची क्षमता ...
रत्नागिरी : जिल्ह्यात ६ कोरोना रुग्णालये, २४ डी. सी. एच. सी. आणि ३१ सी.सी.सी आहेत. त्यात एकूण बेडची क्षमता ३७०० इतकी आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये मिळणारी आरोग्य सुविधा अपुरी असल्याने काही रुग्ण सरकारी रुग्णालयात न जाता भरमसाठ पैसे भरून खासगी रुग्णालयांमध्ये जात आहेत. मात्र, सामान्यांना खासगी रुग्णालयांकडून अगदी नऊ लाख रुपयांपर्यंत बिल आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून केल्या जात आहेत. प्रशासनाने खासगी रुग्णालयांना दर निश्चिती करून दिली असली तरी खासगी रुग्णालये नियमाप्रमाणे बिल आकारणी करतील का, याबाबत साशंकता आहे.
जिल्ह्यात सध्या ४५७६ कोरोना रूग्ण सक्रिय आहेत. जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय, महिला रुग्णालय, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय ही तीन आणि अपेक्स आणि वालावलकर रुग्णालय ही दोन खासगी रूग्णालये आहेत. सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ४५७६ इतकी आहे. यापैकी गृहअलगीकरणात ११०० रुग्ण आहेत. तीन शासकीय रुग्णालयात ४०१ तर दाेन खासगी रुग्णालयात ७४ रुग्ण आहेत. जिल्ह्यात २६ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये एकूण ६४४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी कामथे, दापोली उपजिल्हा रुग्णालये तसेच अन्य तीन शासकीय सेंटरमध्ये १३८ तर २१ खासगी सेंटरमध्ये तब्बल ५०२ रुग्ण भरमसाठ पैसे भरून उपचार घेत आहेत. तीच स्थिती कोरोना केअर सेंटरची आहे. जिल्ह्यात २७ कोरोना केअर सेंटर्स आहेत. त्यामध्ये १०३९ रुग्ण आहेत. त्यापैकी शासकीय केअर सेंटरमध्ये ३९५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित ६४४ रुग्ण खासगी केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
सद्य:स्थिती पाहाता, शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटा किंवा अपुऱ्या सुविधांमुळे खासगी रुग्णालयांत भरमसाठ पैसे भरून उपचार घेतले जात आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत खासगी रुग्णालये उपचाराच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट करत आहेत. त्यात सामान्य माणसाला या रुग्णालयात जाण्याची वेळ आली तर बिल देताना नाकी नऊ येत आहेत. सध्या प्रशासनाने दर निश्चिती केली असली तरी अनेक बाबींच्या नावाखाली रुग्णांकडून ही लूट होतच आहे.