माहेर संस्थेत जागृती केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:29 AM2021-04-15T04:29:50+5:302021-04-15T04:29:50+5:30
रत्नागिरी : निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये समाजातील अडचणीत सापडलेली मुले, मुली, महिला, वृध्द व गरजू लोकांना मोफत सल्ला, ...
रत्नागिरी : निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये समाजातील अडचणीत सापडलेली मुले, मुली, महिला, वृध्द व गरजू लोकांना मोफत सल्ला, मार्गदर्शन व महिती मिळावी, यासाठी माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे यांच्या संकल्पनेतून जागृती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्याच्या फलकाचे उद्घाटन माहेर संस्थेच्या संस्थापिका संचालिका ल्युसी कुरियन यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या निराधार व काळजी संरक्षणासाठी दाखल झालेल्या मुली, मुलगे तसेच निराधार महिला व पुरुष यांना सांभाळण्याचे व पुनर्वसनाचे काम करुन त्यांना सामाजिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न संस्था करीत आहेच. परंतु माहेर संस्था एक पाऊल पुढे जात समाजातील अडचणीत सापडलेली मुले, मुली, महिला, वृध्द व गरजू लोकांना मोफत सल्ला, मार्गदर्शन व महिती मिळावी, यादृष्टीने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या जागृती केंद्राच्या माध्यमातून गरजू लोकांना सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशन, माहिती, मदत, आहार, आरोग्य, सहारा, शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन या बाबींचा मोफत लाभ मिळणार आहे. गरजू लोकांनी माहेर संस्था, निवळी फाटा, हातखंबा येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.
या उद्घाटनप्रसंगी माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांनी शुभेच्छा देताना माहेर संस्था समाजातील तळागाळापर्यंत काम करीत आहेच. परंतु या जागृती केंद्रामुळे लोकांच्या खऱ्या अडी-अडचणी सोडविण्यास मदत होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमप्रसंगी माहेर संस्था, पुणेचे सामाजिक कार्यकर्ते रमेश चौधरी, मंगेश पोळ, बाळू साकोरे तसेच माहेर संस्था, रत्नागिरीचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या मीरा गायकवाड, शीतल हिवराळे, अमित चव्हाण, रामदास पाटील, शिल्पा डांगे, सीता मिश्रा, विजया कांबळे, नंदिनी पाटील, श्रध्दा चव्हाण, अमित येलवे, जोसेफ दास, आशिष मुळ्ये व संस्थेतील सर्व प्रवेशित उपस्थित होते.