हरिनामाच्या जयघोषात दुमदुमली रत्नागिरी; गोल रिंगणाचे आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 11:43 AM2024-02-06T11:43:42+5:302024-02-06T11:43:53+5:30
रत्नागिरी : श्री पांडुरंगाच्या जयघोषात, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी शहरातील माळनाका येथील शिर्के उद्यान येथे उभारण्यात आलेल्या २१ फुटी ...
रत्नागिरी : श्री पांडुरंगाच्या जयघोषात, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी शहरातील माळनाका येथील शिर्के उद्यान येथे उभारण्यात आलेल्या २१ फुटी श्रीविठ्ठलाच्या मूर्तीचे लाेकार्पण साेमवारी सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. भाविकांनीही विठ्ठल नामाचा जयजयकार केला.
महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या शिर्के उद्यानाचे सुशोभीकरण करणे या विकासकामातून २१ फुटी विठ्ठल मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीचे लोकार्पण सोहळा हभप माधव महाराज शिवणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील, हभप बापूसाहेब महाराज देहूरकर, हभप मनोहर महाराज आवटी, राजेश ओसवाल, नीलेश महाराज, देविदास महाराज, शितोळे सरकार उपस्थित होते.
तत्पूर्वी मारुती मंदिर ते मराठा मैदान अशी वारकरी दिंडी काढण्यात आली. मंत्री सामंतही दिंडीत सहभागी झाले होते. विठू माऊलीच्या जयघोषात वीणा, टाळ मृदंगाच्या तालावर मराठा मैदान येथे गोल रिंगण करण्यात आले. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रमुख शितोळे सरकार यांच्या हिरा व मोती या अश्वांनी रिंगण पूर्ण केले. वारीतील माऊली रथाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले हाेते.
त्यानंतर शिर्के उद्यानातील श्रीविठ्ठल मूर्ती ठिकाणी वारकऱ्यांचा मेळा भरला हाेता. पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कोनशिलेचे अनावरण केले.
वारीची अनुभूती
पंढरपूर येथे वारीनिमित्त वारकरी करीत असलेले गोल रिंगण, रिंगण पूर्ण करणारे मोती व हिरा अश्व, वारीप्रमाणे सहभागी माऊलीचा रथ, टाळ, मृदंगाच्या तालावर वारकऱ्यांचा पांडुरंग नामाचा जयघोष पाहून समस्त रत्नागिरीकरांना प्रथमच वारीची अनुभूती आली. हा क्षण अनेकांनी मोबाइलमध्ये टिपूनही घेतला.