मनेसची शाखा तिथे नाका करा : राज ठाकरे
By अरुण आडिवरेकर | Published: July 13, 2023 06:59 PM2023-07-13T18:59:34+5:302023-07-13T19:00:10+5:30
लोकांशी संवाद ठेवाल तेव्हाच खऱ्या अर्थाने जिंकाल
चिपळूण : मला माणसं मोठी झालेली आवडतात. आपल्या पक्षाचा मंत्री झाला तर नक्कीच आवडेल. त्यासाठी एकमनाने व एका परिवाराने पक्ष संघटनेचे काम करा. मनसेची शाखा तिथे नाका करा. तिथेच तुम्हाला लोकं भेटतील त्यांचे प्रश्न सोडवा. लोकांशी संवाद ठेवाल तेव्हाच खऱ्या अर्थाने जिंकाल, हा बदल जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी महिन्याभरात घडवून त्याचा रिझल्ट द्यावा, अशी तंबीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
चिपळूण दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांच्या हस्ते चिपळूण शहरातील मार्कंडी येथील मनसेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरूवारी (१३ जुलै) करण्यात आले. यानंतर अतिथी सभागृह येथे आयोजित केलेल्या जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीवर मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, पदाने एकमेकांशी बोलण्यापेक्षा मनाने बोला. मी जुना, मी नवा, मी ज्येष्ठ आणि कोणी कनिष्ठ असा भेदभाव न होता, एकदिलाने पक्षाचे काम करा. तेव्हाच कुठे पक्षाचा विजय होईल. आजतागायत मी कधीही पक्षाच्या कार्यकर्त्याला कार्यकर्ता संबोधले नाही, तर त्याला सहकारी म्हणूनच ओळखतो. याच सहकाऱ्यामधून मनसेचा एखादा नगरसेवक, आमदार, खासदार होऊद्या. दिल्लीला महाराष्ट्र दाखविण्याची वेळ आली आहे. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी काम करावे, असे त्यांनी सांगितले.
यापुढे प्रत्येक पदाधिकाऱ्याचे काम तपासले जाईल. जे कोणी काम करणार नाही, त्यांना बदलून नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. जिल्हाध्यक्षच नव्हे तर कोकणस्तरावरील नेत्यांमध्येही बदल घडवला जाईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. यानिमित्त जिल्ह्यातील नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.