रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार; पुढील काही दिवस मुसळधार शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 01:01 PM2024-06-14T13:01:54+5:302024-06-14T13:02:50+5:30
सर्वाधिक पाऊस चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात पडल्याची नोंद
रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी सकाळपासून जोर अधिकच वाढला असून दिवसभर संततधारेने पाऊस सुरू होता. त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २५.३२ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला असून आतापर्यंत १८८.३७ मिलीमीटर सरासरी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात पडल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे.
गेल्या तीन- चार दिवसांपासून रात्री पाऊस आणि दिवसा ऊन, असे पावसाचे चित्र होते. मात्र, बुधवार रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी सकाळी थोडासा पाऊस थांबला होता. मात्र, सकाळी ११ वाजेपासून तो पुन्हा सुरू झाला. दुपारनंतर तर मुसळधार सुरू झाली. सायंकाळपर्यंत पाऊस संततधारेने पडत होता.
दरम्यान, अरबी समुद्रात मान्सूनची वाटचाल अधिक वेगाने झाल्याने कोकण किनारपट्टी भागात येत्या काही दिवसांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.