रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने गतवर्षीची सरासरी ओलांडली; जगबुडी नदी इशारा पातळीवर
By शोभना कांबळे | Published: September 9, 2023 04:33 PM2023-09-09T16:33:00+5:302023-09-09T16:33:42+5:30
आज, शनिवारी पावसाने काही काळ उघडीप दिली
रत्नागिरी : गेल्या दिवसभरातील पावसाच्या संततधारेने जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीची सरासरी पावसाने ओलांडली आहे. खेड येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण येथील परशुराम घाटात काही ठिकाणी माती रस्त्यावर आल्याने या घाटातील वाहतूक चिरणीमार्गे फिरविण्यात आली आहे. आज, शनिवारी पावसाने काही काळ उघडीप दिली.
शुक्रवारी पहाटेपासून पावसाने चांगलाच जोर घेतला होता. शनिवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दुपारनंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली. शुक्रवारी दिवसभर पडलेल्या पावसात गुहागरात सर्वाधिक (१७० मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली असून लांजा (१४४ मिलीमीटर), रत्नागिरी (१४०), चिपळूण (१३९ मिलीमीटर), दापोली (१२५ मिलीमीटर), राजापूर (११४ मिलीमीटर), खेड (११३ मिलीमीटर) या तालुक्यांमध्येही मुसळधार पाऊस पडला आहे. मंडणगड आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २७१९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीची सरासरी (२६५५ मिलीमीटर) पावसाने ओलांडली आहे. एका दिवसाच्या पावसाने खेडमधील जगबुडी नदीचे पात्र ५.७५ मीटरपर्यंत गेले आहे. अन्य नद्या इशारा पातळीच्या खाली आहेत. हवामान खात्याने जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.