उत्पन्न मिळवून देणारं ‘पांढरं साेनं’ काळवंडलं; रत्नागिरीत आंबा पिकापाठोपाठ काजूवर थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 02:13 PM2023-04-03T14:13:45+5:302023-04-03T14:14:18+5:30
हवामानातील बदलामुळे काजू पीकही धोक्यात
रत्नागिरी : ‘पांढर सोनं’ म्हणून जिल्ह्याला उत्पादन देणारे काजू पीकही हवामानातील बदलामुळे धोक्यात आले आहे. काजूवर फुलकिडे, टीम माॅस्क्यूटो रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. टरफल काळे पडले असून, काही ठिकाणी गरही काळा पडला आहे. उत्पादन कमी असताना बाजारातील दरही खालावल्याने आंबा पिकापाठाेपाठ काजू पीकही धोक्यात आले आहे.
ओले काजूगर विक्रीबरोबर वाळलेल्या काजू बीची विक्री करून शेतकऱ्यांना आर्थिक प्राप्ती होते. गावठी काजूबरोबरच कोकण कृषी विद्यापीठ प्रमाणित ‘वेंगुर्ला ४ व ५’ या वाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी हवामानामुळे काजू उत्पादन अत्यल्प आहे. त्यातच सुरुवातीपासून फुलकिडे (थ्रीप्स), टीम माॅस्क्यूटो रोगाचा प्रादुर्भाव राहिला आहे. त्यामुळे काजू पिकावरही कीड प्रतिबंधात्मक फवारणी करावी लागत आहे.
फवारणी करूनही शेतकरी फुलकिड्यांवर नियंत्रण मिळवू शकलेले नाहीत. त्यामुळे काजू बीच्या टरफलावर काळे डाग पडले आहेत. काळपटपणा गरापर्यंत पोहोचला असून, गर खराब झाला आहे. काळे डाग पडलेली काजू बी बाजारात विक्रीसाठी चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही ठिकाणी काजू बीचा आकारही कमी झाला आहे.
दरात घसरण
वाळलेली काजू बी फेब्रुवारीपासूनच काही ठिकाणी बाजारात आली. सुरुवातीला १३८ रुपये दर देण्यात आला. मात्र, आता दरात घट झाली आहे. गावठी काजूला १०० ते १०५ रुपये तर वेंगुर्ला काजू बीसाठी ११२ ते ११५ रुपये दर प्राप्त होत आहे. वेंगुर्ला काजू लागवडीनंतर चार ते पाच वर्षांत उत्पादन सुरू होते. काजू बीचा आकार, चव व दर्जा चांगला असल्याने दर अधिक मिळतो. त्यामुळे वेंगर्ला काजू लागवडीवर विशेष भर आहे.
परदेशी काजू आयात
दोन वर्षांपूर्वी काजू बीला १५० रुपये दर मिळाला होता. प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांना काजू प्रक्रियेसाठी दरामुळे खरेदीसाठी भांडवल गुंतवणुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. तुलनेने परदेशी काजूचा दर कमी आहे. चव, दर्जा याचा प्रश्न असला तरी भांडवल गुंतविणे शक्य नसल्याने प्रक्रिया उद्योजक स्थानिक काजूपेक्षा परदेशी काजू खरेदी करत
आहेत.
राेगाबाबत संशोधन हाेणे गरजेचे
आंबा तसेच काजू पिकावर थ्रीप्स (फुलकिडे) चा प्रादूर्भाव होत असून, पिकाची उत्पादकता धोक्यात येत आहे. बाजारात विविध कंपन्यांची महागडी कीटकनाशके उपलब्ध आहेत. मात्र त्याची फवारणी करूनही अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यावर प्रभावी कीटनाशकांसाठी कोकण कृषी विद्यापीठामध्ये संशोधन होणे गरजेचे आहे. हे संशाेधन हाेण्यासाठी लाेकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची मागणी आता हाेऊ लागली आहे.
यावर्षी उत्पादन कमी असताना फूलकिडे, टीम माॅस्क्यूटोचा प्रादूर्भाव अधिक राहिला त्यामुळे काजू पिकाचे नुकसान झाले आहे. उत्पादन कमी आहे, शिवाय काळे डाग, आकार कमी, गर खराब होत दर्जावर परिणाम झाल्याने आर्थिक नुकसान होत आहे. -के. व्ही. बापट, शेतकरी