राजापुरातील घटनेने खळबळ : बंद घर फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 04:06 PM2019-05-08T16:06:15+5:302019-05-08T16:09:32+5:30
राजापूर शहरामधील चर्मकारवाडीतील सत्यवान रामजी कदम यांचे निवासस्थान सोमवारी रात्री उशिरा फोडण्यात आले. यामध्ये चोरट्यानी देवस्थानच्या सुमारे ८० तोळे चांदीच्या मुकुटासह सोन्याच्या अन्य वस्तू व रोख रक्कम असा अंदाजे दीड ते दोन लाखांचा ऐवज लांबवला.
राजापूर : शहरामधील चर्मकारवाडीतील सत्यवान रामजी कदम यांचे निवासस्थान सोमवारी रात्री उशिरा फोडण्यात आले. यामध्ये चोरट्यानी देवस्थानच्या सुमारे ८० तोळे चांदीच्या मुकुटासह सोन्याच्या अन्य वस्तू व रोख रक्कम असा अंदाजे दीड ते दोन लाखांचा ऐवज लांबवला.
त्यामुळे खळबळ उडाली असून, याप्रकरणी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. मात्र, तेथूनच काही अंतरावर असलेल्या एसबीआय बँकेपर्यंत श्वान येऊन घुटमळला. त्यामुळे पुढे काहीच तपास झाला नाही.
राजापूर शहरातील चर्मकारवाडीतील नागरिक सत्यवान रामजी कदम हे आपल्या कुटुंबियांसह मुंबईत वास्तव्याला असून, ते एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. अधूनमधून त्यांचे राजापुरात येणे-जाणे असते. शहरातील चर्मकारवाडीत राम निवास हे त्यांचे निवासस्थान आहे. तेथे त्यांची भावजय गीता गंगाराम कदम राहतात. शिवाय रवींद्र शांताराम चव्हाण हे त्यांच्या नात्यातीलच भाडेकरुदेखील त्याच निवासस्थानात राहतात.
सोमवारी सत्यवान कदम यांची भावजय गीता कदम या साळिस्ते (सिंधुदुर्ग) येथे आपल्या मुलीकडे गेल्या होत्या, तर त्यांचे भाडेकरु रवींद्र चव्हाण हे गवाणे (ता. लांजा) येथे पूजेसाठी गेले होते. त्यामुळे रात्री घरी कुणीच नव्हते. नेमक्या त्याच रात्री अंदाजे दीड दोन वाजल्यानंतर सत्यवान कदम यांचे घर फोडले. ही बाब मंगळवारी आजुबाजुच्या लोकांच्या लक्षात आली व झालेला प्रकार पुढे आला.
त्यानंतर आजुबाजुच्या मंडळींपैकी कुणीतरी मुंबईत असलेले सत्यवान कदम यांच्याशी संपर्क साधून झाल्या प्रकाराची कल्पना दिली, तर गवाणे येथून थेट आपल्या कामावर गेलेले भाडेकरू रवींद्र चव्हाण यांनाही माहिती देण्यात आली.
राजापूर पोलीस ठाण्यात झालेल्या घरफोडीची खबर देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले. रत्नागिरीहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.
श्वानपथक घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी तपास सुरु केला. कदम यांच्या निवासस्थानाच्या दर्शनी दरवाजाची कडी कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. घरातील प्रत्येक रुममधील कपाटे उघडी पडली होती. आतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.
झालेल्या घरफोडीत कदम यांच्याकडे असलेल्या देवचव्हाटा या देवस्थानचा सुमारे ८० तोळ्यांचा चांदीचा मुकुट, सुमारे पंधरा ग्रॅमच्या सोन्याच्या दोन चेन, सत्यवान कदम व त्यांची भावजय गीता कदम यांच्याकडील प्रत्येकी पंधरा हजारांची रोकड, रवींद्र चव्हाण यांच्या मुलीच्या कानातील तीन ग्रॅमचे सोन्याचे रिंग व साडेसहा हजार रुपये असा अंदाजे दीड ते दोन लाखांचा माल चोरट्यांनी लांबविला आहे.
याबाबत पोलिसांचा तपास सुरु होता, जाबजबाब घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी खास बोलावलेल्या श्वानपथकाने कदम यांच्या घरापासून माग घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या घरापासून लगतच असलेल्या एसबीआय बँकेपर्यंत श्वान पोचला व नंतर तेथेच थांबला. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी तेथून वाहनांनी पोबारा केला असावा, असा कयास आहे.