अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमीन खचण्याच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:19 AM2021-07-23T04:19:56+5:302021-07-23T04:19:56+5:30
राजापूर : अतिवृष्टीमुळे तालुक्यात जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. तारळ - चौके रस्त्यासह विखारेगोठणेकडे जाणारा रस्ता आणि त्या मार्गावरील ...
राजापूर : अतिवृष्टीमुळे तालुक्यात जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. तारळ - चौके रस्त्यासह विखारेगोठणेकडे जाणारा रस्ता आणि त्या मार्गावरील कॉजवे डोंगर येथे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
सरींवर असणार्या पावसाने जोर धरला आहे. त्यातूनच अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्यात वाढ होऊन दुपारनंतर पुन्हा एकदा शहरासह लगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्री उशिरा पुराचे पाणी ओसरल्याने व्यापारी काहीसे निर्धास्त झाले होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून पावसाने जोर धरल्याने आलेल्या पुराने पुन्हा एकदा व्यापार्यांची त्रेधातिरपीट उडवली आहे.
दरम्यान, गत आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्येही अतिपर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यात जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेला तारळ - चौके रस्ता खचला आहे. तर कणेरी-विखारेगोठणेकडे जाणारा रस्ताही खचला आहे. याच रस्त्यावरील कॉजवेला डोंगर येथे काही प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे त्यावरून गाड्या चालविणे धोक्याचे झाले असून, तारळ-चौके आणि विखारेगोठणे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पर्जन्यवृष्टीमध्ये कुंभवडे वाऊलवाडी येथील वसंत तुकाराम राघव यांच्या पडवीची भिंत कोसळून घराचे व पडवीचे अंशतः नुकसान झाले आहे तर कोंडतिवरे येथील श्रीकृष्ण गजानन पाध्ये यांच्या गोठ्यावर नारळाचे झाड मोडून पडल्याने नुकसान झाले आहे.