संगमेश्वरातील २४ शाळांचे समायाेजन कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 11:56 AM2021-11-19T11:56:04+5:302021-11-19T11:57:01+5:30
सचिन माेहिते देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील सुमारे ३५२ प्राथमिक शाळांपैकी कमी पटसंख्या असलेल्या २७ प्राथमिक शाळांचे समायोजन करण्यात येणार ...
सचिन माेहिते
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील सुमारे ३५२ प्राथमिक शाळांपैकी कमी पटसंख्या असलेल्या २७ प्राथमिक शाळांचे समायोजन करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून तीन शाळांचे समायोजन करण्यात आले असून, उर्वरित २४ शाळांचे समायाेजन अद्यापही रखडलेले आहे. मात्र, समायाेजन झालेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रवास भत्त्याचा प्रस्ताव अजूनही प्रस्तावितच राहिलेला आहे.
संगमेश्वर तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आहे. तालुक्यातील अनेक शाळा आजही डोंगर वस्त्यांमध्ये आहेत. काही शाळांपर्यंत किंवा त्या- त्या वाडी गावामध्ये एसटी बससारख्या दळणवळणाच्या सोयी नाहीत. त्यामुळे तेथील शाळांचे समायोजन करताना वाहनांचा विचार करावा लागत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील १८ शाळांचे समायोजन यापूर्वीच झाले आहे, तर आता तीन शाळांचे समायोजन करण्यात आले आहे. या तीन शाळांमध्ये साखरपा- भोवरे, मुरादपूर- पातीची आणि किरबेट- ओझर या शाळांचा समावेश आहे. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्याकडून कमी पटाच्या शाळांचे समायोजन करण्यासाठी ग्रामस्थांचे समुपदेशन सुरूच आहे. मात्र, परिस्थितीचा विचार करता काही ठिकाणी हे समायोजन शक्य नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
ज्या शाळांचे समायोजन झालेले आहे त्या शाळांतील मुलांना देण्यात येणारे अनुदान मिळण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मागणी केली आहे. शाळांचे समायाेजन झाले तरी ही मागणी अजून प्रस्तावितच आहे. मोकळा श्वास उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा कशा प्रकारे सर्वांगीण विकास होऊ शकतो, याबाबत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी एक पत्र लिहून पाठविले आहे.
संगमेश्वर तालुका तसा दुर्गम भागात वसलेला आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थांचा नकार, अतिदुर्गम भाग, निर्जन रस्ता, वाहतुकीच्या साधनांचा अभाव, नजीकच्या शाळांचे एक किलोमीटरपेक्षा अधिकचे अंतर यामुळेच बहुतांशी पालक या समायोजनासाठी तयार होत नाहीत. समुपदेशानातून ग्रामस्थांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. -शशिकांत त्रिभुवने, प्रभारी गटशिक्षणाधिकारी