आय. सी. एस. ग्रंथालयाच्या स्मार्टपेजला आली परदेशातूनही मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 12:57 PM2021-02-03T12:57:12+5:302021-02-03T13:00:50+5:30
College Khed Ratnagiri -लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या ग्रंथालयाबाबतची माहिती, पुस्तकांबद्दलची माहिती मिळावी, यासाठी सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालय, खेड ग्रंथालय विभागाकडून आकर्षक अशा स्मार्ट पेजची निर्मिती केली आहे.
खेड : लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या ग्रंथालयाबाबतची माहिती, पुस्तकांबद्दलची माहिती मिळावी, यासाठी सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालय, खेड ग्रंथालय विभागाकडून आकर्षक अशा स्मार्ट पेजची निर्मिती केली आहे.
ग्रंथालयाची वेबसाईट, वेबपेज, न्यूज रिपॉझिटरी, फोटो गॅलरी, नोटीस, युट्यूब चॅनेल, मोबाईल ॲप, लायब्ररीयन ब्लॉग अशा अनेक बाबी एकाच पेजवर उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रंथालयाबाबतची सर्व माहिती येथे उपलब्ध आहेच, शिवाय वाचकांसाठी ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉगही देण्यात आले आहे.
हे स्मार्टपेज मोबाईलवर विद्यार्थ्यांना अगदी सहजरित्या वापरता येण्याजोगे व आकर्षक आणि कल्पक असे बनवले गेले आहे. या स्मार्टपेजची कल्पना आवडल्याने दक्षिण आफ्रिकेतील एस. आय. एम. टी. ॲक्रा, घाना या संस्थेने सहजीवन शिक्षण संस्थेकडे या स्मार्टपेजची कल्पना आपल्या संस्थेत वापरण्याची रितसर परवानगी मागितली आहे. संस्थेचे रजिस्ट्रार जोसेफ डंकी यांनी हे पत्र पाठवले असून, याच मागणीपत्रात हे स्मार्ट पेज बनवणाऱ्या ग्रंथपाल डॉ. राजेश राजम यांचे अभिनंदनही केले आहे.
लवकरच सहजीवन शिक्षण संस्थेकडून अशा प्रकारचे स्मार्टपेज वापरण्यासाठी परवानगी देणारे पत्र एस. आय. एम. टी. घाना या संस्थेस दिले जाणार आहे. तसेच ग्रंथपालांकडून त्यांना तांत्रिक सहाय्यही पुरवले जाणार आहे. एवढेच नव्हे तर मागणी केल्यास ज्या महाविद्यालयांना अशा प्रकारच्या स्मार्ट पेजची निर्मिती करायची असेल तर त्यांनाही सहाय्य केले जाईल, असे संस्थेकडून सांगण्यात आले.
या स्मार्ट पेजच्या उद्घाटन कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष हिराभाई बुटाला, सचिव मंगेश बुटाला, महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. सारंग यांनी कौतुक केले होते. आता पुन्हा प्राचार्य व सर्व संस्था पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
संस्थेसाठी अभिमानास्पद : मंगेश बुटाला
आपल्या संस्थेच्या महाविद्यालयात अशा प्रकारचे स्मार्ट पेज बनवले जाणे आणि त्याला परदेशातूनही मागणी येणे, ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचे संस्थेचे सेक्रेटरी मंगेशभाई बुटाला यांनी सांगितले. या स्मार्ट पेजच्या निमित्ताने संस्था व महाविद्यालयाची ओळख परदेशापर्यंत झाली, ही भूषणावह आणि आनंदाची बाब आहे, असे महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले म्हणाले.