बारमाही शेतीतून मिळविले उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST2021-05-27T04:33:15+5:302021-05-27T04:33:15+5:30
मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील चंद्रकांत बाबू ठोंबरे ६२ वर्षांचे आहेत; मात्र गेली ...

बारमाही शेतीतून मिळविले उत्पन्न
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील चंद्रकांत बाबू ठोंबरे ६२ वर्षांचे आहेत; मात्र गेली ३५ ते ४० वर्षे शेतीमध्ये असून, बारमाही शेतीतून उत्पन्न मिळवीत आहेत. पावसाळी भात व त्यानंतर विविध पिके घेत आहेत. सेंद्रिय शेतीवर भर असल्यामुळे त्यांनी तीन गांडूळ खत युनिट उभारली आहेत. शेतासाठी आवश्यक खताचा वापर करून उर्वरित खत मात्र ते विकत आहेत.
अल्पशिक्षित असलेले ठोंबरे यांनी गेल्या ३५ वर्षांत अनुभवाचे गाठोडे बांधले आहे. पावसाळी भात उत्पादन घेतल्यानंतर भाजीपाला शेती घेत असले तरी त्यासाठी योग्य नियोजन करून शेतात विविध प्रयोगही करीत आहेत. मुळा, माठ, कोथिंबीरसह चवळी, वांगी, कुळीथ, भेंडी, पडवळ, दोडके, मिरची, पावटा लागवड करीत आहेत. सेंद्रिय पद्धतीने शेती करीत असल्याने उत्पन्नाचा दर्जा चांगला असून, विक्री स्थानिक बाजारपेठेत हातोहात होत आहे.
निव्वळ शेती नाही, तर व्यावसायिकदृष्ट्या शेतीतून उत्पादन मिळविण्यावर त्यांचा भर आहे. त्यासाठी त्यांच्या कुुटुंबीयांचे सहकार्य लाभत आहे. बियाणे निवडीपासून, खत व्यवस्थापन ते उत्पादने विक्रीपर्यंत त्यांचे बारकाईने लक्ष असते.
चंद्रकांत ठोंबरे यांनी लागवड केलेल्या भाजीपाला शेतीची पाहणी कृषी पर्यवेक्षक लक्ष्मीकांत मांडवकर यांनी करून मार्गदर्शन केले.
बारमाही शेती करीत असताना चंद्रकांत ठोंबरे पालेभाज्या, तसेच विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेत आहेत.
काजू , नारळ उत्पादन
ठोंबरे यांनी दोनशे काजूच्या झाडांची लागवड केली आहे. दरवर्षी त्यांना तीन ते साडेतीन टन काजू बी प्राप्त होते. शहरात चांगला दर प्राप्त होत असल्याने काजूची विक्री करीत आहेत. यावर्षी मात्र काजू उत्पादनावर परिणाम झाला आहे. पन्नास नारळ लागवड करण्यात आली असून, उत्पादित नारळ स्थानिक पातळीवर विक्री करीत आहेत. सध्या नारळाला चांगला दर प्राप्त होत असून, विक्रीही चांगल्या प्रकारे होत आहे.
मिरची उत्पादन
सर्व प्रकारच्या पालेभाज्यांसह कोथिंबीर, वांगी, चवळी, पावटा, कुळीथ लागवड करीत आहेत. याशिवाय, हिरव्या मिरचीचे ते उत्पादन घेत आहेत. मिरची लागवडीतून चांगला फायदा होत असल्याचे ठोंबरे यांचे मत आहे. भात काढणीनंतर कुळीथ लागवड करतात. जाकादेवी, तसेच कोतवडे बाजारातच त्यांच्याकडील उत्पादित भाज्यांची विक्री होत आहे. लाॅकडाऊनमुळे घराशेजारीच विक्री शक्य होत आहे.
खतातून उत्पन्न
सेंद्रिय शेतीवर भर असल्याने ठोंबरे यांनी गांडूळ खत निर्मितीची तीन युनिट तयार केली आहेत. दर तीन महिन्यांनी एक टन खत उत्पन्न प्राप्त होत असून, वर्षाला १० ते १२ टन खत प्राप्त होत आहेत. आवश्यक तेवढे खत शेतीसाठी वापरून उर्वरित खताच्या विक्रीतून उत्पन्न मिळवीत आहेत. याद्वारे त्यांना चांगले अर्थार्जन प्राप्त होत आहे.
हळद लागवड
पावसाळ्यात भाताचे उत्पादन घेत असताना दोन गुंठे क्षेत्रावर हळद लागवड करीत आहेत. पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रावर हळद लागवड करण्यात येत आहे. २५ ते ३० किलो हळद उत्पादन घेण्यात येत असून, विक्रीतून त्यांना उत्पन्न मिळत आहे. सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या हळदीचा दर्जा चांगला असून, हळदीला चांगली मागणी होत आहे.