अवकाळी पावसामुळे बागायतदार चिंतेत

By admin | Published: February 28, 2015 11:42 PM2015-02-28T23:42:24+5:302015-02-28T23:42:51+5:30

शनिवारी दुपारनंतर सुखद गारवा

Inconvenience caused due to rainy season | अवकाळी पावसामुळे बागायतदार चिंतेत

अवकाळी पावसामुळे बागायतदार चिंतेत

Next

रत्नागिरी : उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना शनिवारी दुपारनंतर सुखद गारवा देत पावसाने हलकेच आपले आगमन केले. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या अनेक भागांत या पावसाची बरसात झाली. जोर नसला तरी या पावसाने अनेकांची तारांबळ उडविली. पावसाबरोबरच बराच काळ मळभाचे वातावरण असल्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रत्नागिरी शहरात दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. दोन ते सव्वादोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या पावसाने अनेकांची त्रेधातिरपीट उडविली. पाऊस किरकोळ असला तरी त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
देवरुख, लांजा, राजापूर, चिपळूण, गुहागर आदी परिसरातही जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे परिसरालाही अवेळी पावसाने दणका दिला. चौथा शनिवार असल्याने गणपतीपुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. दुपारी दोनच्या दरम्यान पाऊस सुरू होताच पर्यटक आणि व्यावसायिकांची धावपळ उडाली. अनेक व्यावसायिकांनी दुपारीच आपली दुकाने बंद करणे पसंत केले. काही हौशी पर्यटकांनी मात्र या पावसाचा आनंद लुटला. खेडमध्येही सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची बरसात सुरू होती.
गुहागरात शनिवारी दुपारपासून पावसाने संततधार सुरू केली. अवेळी आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांवर मोठे संकट ओढवले आहे. ऐन शिमगा सणात अचानक आलेल्या पावसामुळे संकासुर देवखेळ्यांनाही दुपारनंतर नाइलाजास्तव विश्रांती घ्यावी लागली. शृंगारतळी येथे आठवडा बाजारातील विक्रेते तसेच खरेदीदारांची पावसाने तारांबळ उडविली. चिपळुणात सकाळी काडाक्याने ऊन पडले होते, परंतु दुपारी अचानक वातावरण ढगाळ झाले. गार वारा सुटला होता. त्यानंतर अवकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली. पावसामुळे जमीन भिजल्याने मातीचा सुगंध सुटला होता. तालुक्याच्या सर्वच भागात हा पाऊस पडला.
शनिवारची सकाळ मळभट पावसाळी वातावरण घेऊन आली. पावसाची चाहुल लागल्याने आंबा बागायतदारांसह ग्रामीण भागातील नागरिक धास्तावले होते. दुपारच्या सत्रात थांबलेला पाऊस पुन्हा एकदा सायंकाळी पडला.
आंबा मोहोराला आलेला असून, अनेक ठिकाणी लहानमोठ्या कैऱ्याही धरल्या आहेत. वर्षभर महागडी औषधे, फवारण्या करून हातातोंडाशी येणारे पीक पावसामुळे गळून पडण्याची, त्यावर डाग पडण्याची भीती आहे. यामुळे आंब्याचे मोठे नुकसान होण्याची भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत. आंबा बागायतदारांप्रमाणेच सुपारी बागायतदारांनाही या अवेळी पावसाचा फटका बसला आहे. वाळवणास टाकलेली सुपारी काही प्रमाणात काढली असली, तरी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळवण भिजून गेली.
विक्रेत्यांची तारांबळ
रत्नागिरीत दर शनिवारी आठवडा बाजार भरतो. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी विक्रेते ताडपत्री किंवा प्लास्टिकचा वापर करतात. मात्र, तरीही पावसामुळे साऱ्याच विक्रेत्यांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागातून खरेदीला आलेल्या लोकांनाही खरेदी सोडून आश्रय शोधावा लागला. (प्रतिनिधी)
 

Web Title: Inconvenience caused due to rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.