सात दिवस पाणी नसल्याने नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:29 AM2021-04-26T04:29:01+5:302021-04-26T04:29:01+5:30
रत्नागिरी : गेले सात दिवस झाले इमारतीमध्ये पाणी नाही. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. वारंवार कल्पना देऊनही दुर्लक्ष ...
रत्नागिरी : गेले सात दिवस झाले इमारतीमध्ये पाणी नाही. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. वारंवार कल्पना देऊनही दुर्लक्ष झाल्याने पाण्याशिवाय गैरसोय होत असल्याची व्यथा शिवाजीनगर येथील स्टँडर्ड अपार्टमेंटमधील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वारंवार पाण्याबाबत तक्रार करूनही प्रशासनाकडून मार्ग काढण्यात आलेला नाही. नगरसेवक राजन शेट्ये यांनी एक टँकर पाठविला होता. वास्तविक एप्रिल महिन्यात सर्वत्र पाणी टंचाई असताना, काही ठिकाणी नगर परिषदेच्या पाणीवाहिनीला गळती असल्याने हजारो लीटर पाणी वाहून वाया जात आहे. मात्र स्टँडर्ड अपार्टमेंटमधील रहिवाशांना पाण्याशिवाय राहावे लागत आहे.
स्टँडर्ड अपार्टमेंटमध्ये चार डॉक्टर आहेत. त्यातले तीन डॉक्टर कोरोना रुग्णालयात सेवा बजावत आहेत. शिवाय इमारतीत तीन कोरोना रुग्ण असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. इमारतीच्या बाहेरचा रस्ता खोदल्यापासून इमारतीमध्ये पाणी येणे बंद झाले आहे. या गोष्टीला आता सहा दिवस उलटले असून नागरिकांना पाण्यासाठी तरसावे लागत आहे. अजून किती दिवस पाण्यासाठी वाट पाहायला लावणार असल्याचा प्रश्न स्टँडर्ड अपार्टमेंटवासीयांनी उपस्थित केला आहे.
................................
स्टँडर्ड अपार्टमेंटसाठी मुख्य वाहिनीवरून पाण्याची जोडणी देण्यात आली आहे. मुख्य वाहिनीपासून इमारतीपर्यत गेलेली वाहिनी खराब झाली आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली होती, मात्र रहिवाशांकडून पाइप आणून देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. पाइप आणून देण्याची जबाबदारी रहिवाशांची असून त्यांनी तो आणून दिल्यास तत्काळ खराब पाईप बदलण्यात येईल. शिवाय पाणीपुरवठाही सुरळीत होईल.
- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष, रत्नागिरी