बाहेरील मार्गाने बस सुरू केल्याने तीन गावातील प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:08+5:302021-04-06T04:30:08+5:30
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात एस. टी. महामंडळाने तालुक्यातील चाफेरी, कासारी, सांडेलावगण या मार्गाने बस सुरू केल्या होत्या. पण आता ...
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात एस. टी. महामंडळाने तालुक्यातील चाफेरी, कासारी, सांडेलावगण या मार्गाने बस सुरू केल्या होत्या. पण आता त्यातील सर्वाधिक गाड्या बाहेरील मार्गाने चालू केल्या आहेत. यामुळे आतील तिन्ही गावातील लोकांना एस. टी. तिकीटापेक्षाही दुपटीने पैसे देऊन वडापच्या गाडीने प्रवास करावा लागत आहे.
जयगडमध्ये जायला दोन मार्ग आहेत. त्यामध्ये एक म्हणजे खंडाळ्यामधून चाफेरी, कासारी, सांडेलावगण, संदखोल मार्गे जयगड तसेच दुसरा मार्ग चाफेरी गवळीवाडी, पाटीलवाडी, कचरे या थांब्यांवरून गाडी जाते. यामध्ये वडापच्या सगळ्या चारचाकी गाड्या अगदी अगोदरपासून ह्या बाहेरच्या म्हणजे गवळीवाडी मार्गे जातात. त्यामुळे तेथील लोकांना नेहमी त्या गाड्यांची सवय झालेली आहे. आणि त्या मार्गे जाणाऱ्या त्या ठरावीक गाड्या चालू आहेतच. पण या लॉकडाऊनच्या काळात एस. टी. महामंडळाने आतून येणाऱ्या जवळजवळ सात ते आठ फेऱ्या ह्या बाहेरच्या मार्गाने चालू केल्या आहेत.
या सर्व गाड्या चाफेरी, कासारी, सांडेलावगण या मार्गाने यायच्या. पण आता त्यातील सर्वाधिक गाड्या बाहेरील मार्गाने महामंडळाने चालू केल्या आहेत. यामुळे आतील तिन्ही गावातील लोकांना एस. टी. तिकीटापेक्षा दुपटीने पैसे देऊन वडापच्या गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यासोबतच त्यांच्या गाड्या भरेपर्यंत त्यांना थांबावे लागते. एस. टी. गाड्यांचे एक वेळेचे नियोजन असते. त्यामुळे आतापर्यंत लोकांना त्या नियोजनानुसार त्या गाड्यांचे वेळेत जाता येत होते, पण सध्या त्या सर्व गाड्या बाहेरच्या मार्गाने जात असल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ह्या सर्व गाड्या अगोदर ह्या मुलांच्या शाळा, कॉलेजनुसारच्या वेळेत चालू होत्या. पण आता त्या गाड्या बंद पडल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
त्यासाठी या सांडेलावगण ग्रामपंचायतीतर्फे मागील मासिक सभेत ठराव संमत करून त्याचे पत्र रत्नागिरी आगार व्यवस्थापक यांना ३१ मार्च रोजी देण्यात आले आहे. यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.