लॉकडाऊन काळात लोट्यात अवैध धंद्यांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:16+5:302021-08-20T04:35:16+5:30
आवाशी : कोरोना काळात सर्वच शासकीय यंत्रणा तत्पर असताना, विशेषत: पोलीस यंत्रणा विशेष दक्ष असतानाही लोटे आणि पंचक्रोशी परिसरात ...
आवाशी : कोरोना काळात सर्वच शासकीय यंत्रणा तत्पर असताना, विशेषत: पोलीस यंत्रणा विशेष दक्ष असतानाही लोटे आणि पंचक्रोशी परिसरात अवैध धंद्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
खेड व चिपळूण तालुक्याचा आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीत स्थानिकांसह, परजिल्हे व परप्रांतीयांचा मोठा भरणा आहे. औद्योगिक वसाहतीमुळे लगतच्या गावात बाजारपेठा विस्तारु लागल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंसोबतच इतरही आवश्यक वस्तूंचीही येथे उपलब्धता आहे. त्यात लोटे ही मिनी बाजारपेठ म्हणून ओळखली जात आहे. गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही बाजारपेठ व आजूबाजूची गावे टाळेबंदी आदेशानुसार काही प्रमाणात सुरु ठेवण्यात आलेली आहेत. नियमांची अमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी पोलीस यंत्रणा सतत दक्ष आहे. मात्र कामाचा ताण वाढल्याने पोलिसांचे अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष होत आहे का, अशी परिस्थिती सध्या येथे दिसत आहे.
कोरोना काळातच येथे अवैध धंद्यांना ऊत आला आहे. पूर्वीपासूनच या पंचक्रोशी परिसरात म्हणजे महामार्गाच्या पूर्व - पश्चिम भागात गावठी दारुधंदे, मटका, जुगार हे धंदे ठाण मांडून आहेत. मात्र, आता त्यात गोवा बनावटीची दारू, देशी व विदेशी दारूची चोरटी विक्री, गांजा, गुटखा यांची विक्री यात बऱ्याच पटीने वाढ झालेली आहे. छोट्या - छोट्या टपऱ्यांमधूनही यांची विक्री केली जात आहे. या काळात अनेकदा येथील गावठी दारुधंदे व गोवा बनावटीच्या दारूविक्रीवर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापे टाकले. दोनच दिवसांपूर्वी येथील पूर्वेकडील वस्तीत स्थानिक पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या पाचजणांना ताब्यात घेतले आहे.
या साऱ्याची पाळेमुळे शोधून त्यातील दोषींना शोधून काढावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.