फसवणुकीच्या घटनात वाढ, रत्नागिरी जिल्ह्यात तीन महिन्यांत ९ जणांना ७७ लाखांचा गंडा
By अरुण आडिवरेकर | Published: March 27, 2023 06:13 PM2023-03-27T18:13:20+5:302023-03-27T18:13:43+5:30
शिक्षणाने आपण कितीही प्रगत झालाे, कितीही ज्ञानाच्या गाेष्टी केल्या तरी या ना त्या कारणाने काेणीतरी आमिष दाखवताे आणि आपण फसताे
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : शिक्षणाने आपण कितीही प्रगत झालाे, कितीही ज्ञानाच्या गाेष्टी केल्या, आजूबाजूच्या घटनांकडे पाहत असलाे तरी या ना त्या कारणाने काेणीतरी आमिष दाखवताे आणि आपण फसताे. रत्नागिरी जिल्ह्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत हाेत असून, गेल्या तीन महिन्यांत ९ जणांना तब्बल ७७ लाख १४ हजार ४५४ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील थिच्चूर पद्मनाभन क्रिश्नन (५७, रा. लाेटे, खेड, मूळ रा. कर्नाटक) यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फाॅरेक्स ॲण्ड कमाेडिटी मार्केटमध्ये गुंतवलेले असून, त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ, अशी खाेटी आश्वासने देण्यात आली हाेती. त्यानंतर थिच्चूर यांनी बॅंक ऑफ इंडिया, ॲक्सिस बॅंक आणि एचडीएफसी बॅंक अशा तीन बॅंकांच्या खात्यावर पैसे पाठविले. हे पैसे मेटा ट्रेडर - ५ इव्हेलाेसिटी लि. यामध्ये गुंतवले. त्यानंतर पैसे परत करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
मात्र, पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी खेड पाेलिसांनी राहुल पांडे (पूर्ण नाव, गाव माहीत नाही), तारा (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) आणि प्रणव शर्मा (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) या तिघांवर २५ मार्च राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडमधील हा प्रकार नव्याने समाेर आलेला असला तरी गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील ९ जणांना विविध प्रकारे गंडा घालून त्यांच्याकडील रक्कम हडप करण्यात आली. जिल्ह्यातील या घटनांमध्ये वाढत हाेतच असून, या घटनांनंतरही नागरिक जागृत हाेत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये शिकलेल्या व्यक्तीही फसत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कुरिअर मिळविण्यासाठी
परत गेलेले कुरिअर थांबविण्यासाठी उमरे (ता. रत्नागिरी) येथील प्राैढाने तब्बल ९९ हजार गमावले हाेते. या प्राैढाला लिंक पाठविण्यात आली हाेती. त्यानंतर ऑनलाइन गंडा घालण्यात आला.
राेजगाराच्या नावाखाली
घरबसल्या राेजगार मिळवून देताे, असे सांगून जिल्ह्यातील १५१ महिलांना तब्बल ७२ हजार ६०१ रुपयांना चुना लावण्यात आला. याप्रकरणी जळगावातील एका ठकसेनला गुहागर पाेलिसांनी अटक केली आहे.
नाेकरीच्या बहाण्याने
- नाेकरीचे आमिष दाखवून देवरुखातील एका तरुणाला १२ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या तरुणाने आईवडिलांच्या खात्यातून हे पैसे गुगल पेद्वारे पाठविले हाेते.
- नाेकरी डाॅट काॅम कंपनीचा अधिकारी बाेलताेय सांगून, देऊड-चिंचवाडी (ता.रत्नागिरी) येथील तरुणाला १२ लाख ४० हजार ७३९ रुपयांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल केला आहे.
वीजबिल थकल्याने
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील प्राैढाला वीजबिल थकल्याचा खाेटा मेसेज आला. त्यांनी त्या मेसेजमधील क्रमांकावर संपर्क साधला असता, तब्बल ५ लाखांचा गंडा घालण्यात आला.
गिफ्ट लागल्याचे सांगून
नागावे (ता.चिपळूण) येथील तरुणीला आपण अर्थ कंपनीचे ग्राहक असून, गिफ्ट लागल्याचे सांगण्यात आले. या बक्षिसापाेटी या तरुणीने अवघ्या तीन तासांत तब्बल ७८,१८५ रुपये गमावले.
पार्ट टाइम जाॅब
पार्ट टाइम जाॅब देताे सांगून, चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील तरुणाची १३ लाख १५ हजार ५३४ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
फसवणुकीचा नवा फंडा
हाॅटेलमध्ये राहायचे, मस्त खायचे, माैजमजा करायची आणि बिल न देता निघून जायचे, असा नवा फसवणुकीचा प्रकार समाेर आला आहे. चिपळूण आणि दापाेली येथे असे प्रकार घडले असून, चिपळुणात ७२ हजार, तर दापाेलीत ३४,४३५ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पंजाबमधील दाेघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
अशीही फसवणूक
उज्ज्वला गॅस कनेक्शन देताे सांगून, दापाेलीकरांना गंडा घालण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. या प्रकरणी चंद्रपूर, नांदेड, बीडमधील सहा जणांना अटक केली आहे.
हे टाळा
- माेबाइलवर आलेली काेणतीही लिंक खात्रीशिवाय ओपन करू नका.
- काेणत्याही मेसेजला रिप्लाय देऊ नका.
- पॅन नंबर, आधार नंबर, ओटीपी काेणालाही देऊ नका.
- काेणत्याही आमिषाला बळी पडू नका.
- महावितरण अथवा बॅंकेच्या नावाखाली येणाऱ्या बनावट फाेनला प्रतिसाद देऊ नका.
संपर्क साधा
काेणत्याही प्रकारचा बनावट फाेन आल्यास अथवा मेसेज आल्यास संबंधित कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.
फसवणूक झाल्यास जवळचे पाेलिस स्थानक किंवा सायबर पाेलिस स्थानकात तत्काळ संपर्क साधावा.