तंबाखूपासून सुटका करून घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ, जिल्हा शासकीय रूग्णालय सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 05:53 PM2019-05-31T17:53:20+5:302019-05-31T17:55:19+5:30
वर्षभरात तंबाखूचे व्यसन लागलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६ हजार ७९२ लोकांचे जिल्हा शासकीय रूग्णालयातर्फे समुपदेशन करण्यात आले. त्यातील ४०३ जणांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायमचे सोडून या व्यसनातून आपली सुटका करून घेतली आहे.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : कोणतेही व्यसन वाईटच. कारण एकदा का ते जडलं की, ते सुटायला प्रचंड प्रयत्न करावे लागतात, मात्र, मरणाला कवटाळण्यापेक्षा असे प्रयत्न करणे केव्हाही चांगलेच. गेल्या वर्षभरात तंबाखूचे व्यसन लागलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ७९२ लोकांचे जिल्हा शासकीय रूग्णालयातर्फे समुपदेशन करण्यात आले. त्यातील ४०३ जणांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायमचे सोडून या व्यसनातून आपली सुटका करून घेतली आहे. गेल्या चार वर्षात या व्यसनापासून सुटका करून घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातर्फे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत तंबाखूपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर तंबाखूचे व्यसन लागलेल्या नागरिकांचे समुपदेशनही करण्यात येत आहे. सन २०१८ - १९ या कालावधीत ११ प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. यामध्ये ५३८ लोकांना प्रशिक्षत करण्यात आले. या कार्यशाळेतून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिर घेऊन २ हजार ४१ रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रमही घेण्यात येत आहेत. यामध्ये ५१२ लोकांना जागृत करण्यात आले आहे.
गतवर्षी जिल्हा रूग्णालयातर्फे ६ हजार ७९२ इतक्या लोकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यातील ४०३ लोकांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडल्याची नोंद करण्यात आली आहे. तंबाखूचे व्यसन सोडणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत असून, २०१७ - १८ मध्ये केवळ ६५ लोकांनी तंबाखूचे सेवन सोडले आहे. तर तंबाखू सेवनामुळे कर्करोगग्रस्त रूग्णांची संख्या १२पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अजूनही तंबाखूचे सेवन करणे सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र, यातील काहींची नोंदच होत नसल्याचे दिसत आहे.
दोन वर्षात ४९ हजार १२० दंड वसूल
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास मज्जाव केलेला आहे. अशी व्यक्ती आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. गेल्या दोन वर्षात जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना आढळून आलेल्या लोकांकडून ४९ हजार १२० रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सन २०१७-१८ मध्ये १५ हजार ४५० तर सन २०१८ - १९ मध्ये ३३ हजार ६७० इतकी दंडाची रक्कम वसूल केली आहे.
धाड पथकाची नजर
सिगरेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ (कोटपा कायदा २००३) अन्वये जिल्ह्यात धाड पथकाकडूनही कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात या पथकाने २५९ जणांवर कारवाई करून ४४ हजार ६७० इतका दंड वसूल केला आहे.
तंबाखूमुक्त शाळा
तंबाखूच्या व्यसनापासून नागरिकांनी दूर राहण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तंबाखूमुक्त शाळा अशी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ७ अटी ठेवण्यात आल्या आहेत. या ७ अटींचे पालन करणाºया शाळेला तंबाखूमुक्त शाळा म्हणून जाहीर करण्यात येते.
तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला केवळ कर्करोगच होतो असे नाही. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कोणताही आजार उद्भवू शकतो. त्यामुळे या व्यसनापासून लांब राहणेच चांगले आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू आहे. तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तीने आपली मौखिक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय रूग्णालयात स्वतंत्र कक्ष आहे.
- डॉ. शैलेश दशरथ गावंडे,
जिल्हा सल्लागार, एनटीसीपी, जिल्हा शासकीय रूग्णालय, रत्नागिरी.