लांब पल्ल्यासह शहरी, ग्रामीण मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:59+5:302021-07-19T04:20:59+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी. सेवा सुरू होती. मात्र, अनलाॅकनंतर एस.टी.ची वाहतूक ...
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी. सेवा सुरू होती. मात्र, अनलाॅकनंतर एस.टी.ची वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. कोरोनामुळे चाैथ्या टप्प्यातील शासकीय निर्बंध लागू असल्याने प्रवासी भारमानावर परिणाम झाला आहे. मात्र, प्रवासी प्रतिसादानंतर ग्रामीण, शहरी, लांब पल्याच्या मार्गावरील फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
अनलाॅकनंतर दि. १४ जूनपासून आंतरजिल्हा, ग्रामीण, शहरी मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लाॅकडाऊनपूर्वी २५ रातराणी गाड्या सुरू होत्या. मात्र, अल्प प्रवासी प्रतिसादामुळे अवघ्या सात रातराणी बसेस सुरू आहेत. आंतरराज्य मार्गावर दररोज ११ फेऱ्या सोडण्यात येत असत. मात्र, सध्या पाच फेऱ्याच रत्नागिरी वगळता अन्य मार्गावरून सुरू आहेत. सिंदगी, बिजापूर आगारातून रत्नागिरीत दोन बसेस रोज येत आहेत.
अनलाॅकनंतर शहरी मार्गावर १८ फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ३० गाड्यांद्वारे ७४ फेऱ्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण, लांब, मध्यम पल्ल्याच्या मार्गावर सध्या १२९९ फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
खेडेगावात जाण्यासाठी ‘वडाप’चा पर्याय
तालुक्यापासून ग्रामीण भागात जाण्यासाठी गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या, तरी मोजक्याच गाड्या सुरू आहेत. त्यामुळे काही गावांत जाण्यासाठी रिक्षा, सीटर रिक्षा, टमटम यासारख्या ‘वडाप’चा आधार घ्यावा लागत आहे. रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा, सैतवडे, जयगड, चिपळुणातील पोफळी, तर दापोलीतील हर्णै व अन्य गावांत जाण्यासाठी मोजक्याच गाड्या असल्याने मध्यवर्ती ठिकाणापासून वडापचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, रत्नागिरीतून खंडाळा, चिपळूण, लांजा-राजापूर मार्गावर सुरू असलेली खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. एस.टी.साठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असून, मोजक्या फेऱ्यांमुळे तासन् तास थांबण्यापेक्षा ‘वडाप’चा आधार घेतला जातो.
जनजीवन पूर्वपदावर
कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर हळूहळू येऊ लागले असून, प्रवासी प्रतिसादामुळेच शहरी मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अनलाॅकनंतर अवघ्या १८ मार्गांवर शहरी बसेस सुरू केल्या होत्या.
तब्बल एक महिन्यानंतर ३० मार्गावर ७४ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ग्रामीण असो वा शहरी मार्गावर प्रवासी प्रतिसादात वाढ झाली असल्यानेच फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
ग्रामीणसह आंतरजिल्हा प्रवासांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, लांब पल्ल्याच्या मुंबई, बाेरीवली, पुणे, स्वारगेट मार्गावर गाड्या सुरू केल्या आहेत.
ग्रामीण असो वा शहरी, लांब पल्ला किंवा आंतर जिल्हा वाहतूक सुरू करताना प्रवासी प्रतिसादाचा अंदाज घेऊनच फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापर्यंत बहुतांश गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. आंतरराज्यांतर्गत विजापूर, सिंदगी येथून दोन गाड्या येत असल्या तरी आपल्याकडून जाणाऱ्या गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक.
खंडाळा, जयगड, सैतवडे मार्गावर ठरावीक एस.टी. फेऱ्या सुरू आहेत. ठरावीक फेऱ्यांमुळे अंतर्गत गावातून जाण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने वडापसारख्या खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय दूर होईल.
- सुधीर पाध्ये, संदखोल
तालुक्याच्या ठिकाणाहून गावाकडे जाणाऱ्या ठरावीकच गाड्या आहेत. एक गाडी चुकली की, दोन ते अडीच तासांनी दुसरी गाडी आहे. त्यामुळे प्रवाशांचा अर्धा ते पूर्ण दिवस वाया जातो. त्यापेक्षा रत्नागिरी आगारातून एस.टी. फेऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, जेणेकरून वडापकडे वळलेला प्रवासी एस.टी.कडे परतेल.
- रोशनी चिपळूणकर, चिपळूण