वैशाखात तापमान वाढणार-- कृषी विद्यापीठाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:30 PM2019-04-10T12:30:48+5:302019-04-10T12:34:42+5:30

वैशाखा’त आणखी आठ दिवस पुन्हा कमाल व किमान तापमानात वाढ होण्याचा इशारा दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने दिला आहे. या दिवसात वाऱ्याच्या

Increase in temperature in Vaibhav - warning of Agriculture University | वैशाखात तापमान वाढणार-- कृषी विद्यापीठाचा इशारा

वैशाखात तापमान वाढणार-- कृषी विद्यापीठाचा इशारा

Next
ठळक मुद्दे- बागायती, पाळीव जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन

दापोली : ‘वैशाखा’त आणखी आठ दिवस पुन्हा कमाल व किमान तापमानात वाढ होण्याचा इशारा दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने दिला आहे. या दिवसात वाऱ्याच्या वेगातदेखील वाढ होण्याची शक्यता कृषी विद्यापीठाकडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. 

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पारा ४0 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामानाने रत्नागिरी जिल्ह्यात पाºयाची मजल ३३ ते ३५ अंशापर्यंतच गेली आहे. मात्र हे तापमान रत्नागिरी जिल्ह्याच्या मानानेही खूप होत आहे. या वाढत्या तापमानाची विशेष दखल घेत कोकण कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा दिला आहे. आणखी आठवडाभर तापमानात अशीच वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा, काजू, भाजीपाला याबाबत काय काळजी घ्यावी, याच्या सूचनाही विद्यापीठाने आवर्जून दिल्या आहेत.

या वाढत्या तापमान वाढीमुळे आंबा पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होणार असल्याने फळगळ होण्याची शक्यता आहे. याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के हेक्झॉकोन झोल ५ मिलिलीटर किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा फळांवर फुलकिडीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ टक्के प्रवाही २.५ मिलिलीटर किंवा थायेमेथॉक्झाम २५ टक्के २ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कीटकनाशकाला लेबल क्लेम नाहीत, आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले ‘रक्षक फळमाशी सापळा’ प्रतिहेक्टरी ४ या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यावर लावावेत. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी.  तसेच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. उन्हाळ्यात पहिल्या वर्षी आठवड्यातून दोन वेळा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसातून दोन वेळा व तिसºया वर्षी महिन्यातून दोन वेळा प्रत्येक कलमाला ३० लीटर पाणी द्यावे. 

तसेच काजू पिकामध्ये काही ठिकाणी काढणीयोग्य बी तयार झालेली आहे. तयार झालेल्या बिया बोंडापासून वेगळ्या करून बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवाव्यात. तसेच विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे काजू बोंडापासून विविध टिकाऊ पदार्थ तयार करावेत. कलमांच्या आळ्यांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यासाठी आळ्यांमध्ये वाळलेले गवत, पालापाचोळा किंवा पोलिथीनचे आच्छादन करणे आवश्यक आहे. 

नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना दर आठ दिवसांनी प्रतिकलम १५ लीटर पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारे फूटवे वेळोवेळी काढून टाकावेत. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने नारळ बागेत ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच आळ्यांमध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळांचे आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांना काठीचा आधार द्यावा तसेच कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून पहिली दोन वर्षे रोपांना वरून सावली करावी. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने, सुपारी बागेत ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. उन्हाळी भेंडी पिकाला नत्राचा दुसरा हप्ता ७२ किलो युरिया प्रतिहेक्टरी या प्रमाणात लागवडीनंतर एका महिन्यांनी द्यावा. बाष्पीभवन वाढत असल्याने, रोपवाटिकेस, नवीन फळबागा तसेच भाजीपाल्याला नियमित पाणी देण्याची सूचनाही विद्यापीठाने केली आहे.

Web Title: Increase in temperature in Vaibhav - warning of Agriculture University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.