आरोग्यावरील ताण वाढला; कर्मचाऱ्यांची होतेय ओढाताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:34 PM2021-04-08T18:34:21+5:302021-04-08T18:37:31+5:30
CoronaVirus Ratnagiri -रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट होऊ लागल्याने आता आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू आहे. मात्र, या यंत्रणेत अपुरे डॉक्टर तसेच अन्य कर्मचारी यामुळे सध्या या यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. रूग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची ओढाताण होऊ लागली आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट होऊ लागल्याने आता आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू आहे. मात्र, या यंत्रणेत अपुरे डॉक्टर तसेच अन्य कर्मचारी यामुळे सध्या या यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. रूग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची ओढाताण होऊ लागली आहे.
जिल्ह्यात गतवर्षासारखी कोरोना स्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यासह देशाची स्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात बंद करण्यात आलेली कोविड रूग्णालये तसेच कोरोना केअर सेंटर, कोविड आरोग्य केंद्रे यांच्यात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच रूग्णसंख्या एकाच दिवशी अगदी दीडशेपर्यंत जाऊ लागली आहे. त्यामुळे गेले वर्षभरच आरोग्य सेवेत व्यग्र असलेल्या आरोग्य यंत्रणेची आताही कसरत सुरूच आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर सध्या ही यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे.
डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी दुसऱ्या लाटेचा धोका व्यक्त होऊ लागल्याने शासनाने १६ जानेवारीपासून देशभरातच लसीकरण मोहीम सुरू केली. यात आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, परिचारिका, अन्य आरोग्य कर्मचारी यांच्यानंतर कोरोनाशी लढा देणारे पहिल्या फळीतील महसूल कर्मचारी, पोलीस त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील नागरिक आणि आता ४५ वर्षांवरील सर्व नागरिक यांना लसीकरण केले जात आहे.
सध्या जिल्ह्यात जिल्हा शासकीय रूग्णालये, दापोली, कळंबणी, कामथे ही तीन उपजिल्हा रूग्णालये, सर्व ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आदी ९४ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, परिचारिका तसेच अन्य आरोग्य कर्मचारी व्यग्र असतानाच आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळावर आता ही यंत्रणा पुन्हा कोरोनाशी अथक लढा देण्यासाठी सज्ज आहे.
गेल्यावर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत कमी मनुष्यबळ असले तरीही जिल्हा शासकीय रूग्णालयातील नॉनकोविड रूग्णालयाचे डॉक्टर्स हे कोविड रूग्णालयात सेवा देत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आता कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यास शासनाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे जशी पदांची गरज भासेल, त्याप्रमाणे डॉक्टर्स, परिचारिका यांची पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.
- डॉ. संघमित्रा फुले - गावडे,
जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी
निकषापेक्षा कमी
- शासनाच्या निकषाप्रमाणे १०० खाटांमागे ४६ परिचारिका आवश्यक आहेत. मात्र, जिल्हा रूग्णालयाच्या कोविड रूग्णालयात ११० खाटांसाठी केवळ ३४ परिचारिका आहेत.
पद सध्या कर्मचारी
- वैद्यकशास्त्र तज्ज्ञ (एमडी) ००
- मेडिकल मायक्रोबायोलॉस्ट ००
- इंटेन्सिस्ट ००
- एमबीबीएस ००००
- स्टाफ नर्स ३४
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०२
- एएनएम ४००